नाशिक : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र नसलेल्या महिलांनीही घेतल्याची बाब उघड झाल्यानंतर, नाशिक जिल्ह्यातील दीड लाख संशयित लाभार्थी महिलांची यादी पडताळणीकरिता महिला व बालविकास विभागाला देण्यात आली होती. ही पडताळणी पूर्ण झाली असून, त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातून अपात्र महिला किती याबाबत उत्सुकता लागली आहे.
राज्यात महिलांचा आर्थिक स्तर सुधारावा, त्यांना आरोग्य व पोषणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. मात्र, योजना सुरू झाल्यानंतर अनेक महिन्यांनंतर या महिलांची पात्र- अपात्रतेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात महिलांचे रेशनकार्ड तपासून एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला असल्यास, त्यांचे पत्ते व लाभार्थी मोबाइल नंबरवर फोन करून त्यांची माहिती घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली.
जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत पात्र १५ लाख ३५ हजारांहून अधिक महिलांपैकी दीड लाख महिलांच्या नावाबाबत संशय अथवा एकाच घरातील महिलांचा समावेश असून, त्या लाभार्थी असण्याची शक्यता होती. महिला बालकल्याण विभागाने ११ ऑगस्टपासून पडताळणी सुरू केली. सुरुवातीला हे काम करताना अंगणवाडी सेविका व पात्र महिला यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी पडताळणीस नकार दिला होता. असे असतानाही ही पडताळणी पूर्ण झाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांची माहिती सरकारला सादर करण्यात आली आहे. अजूनही त्यासंदर्भात या कार्यालयाला काहीही पत्र प्राप्त नाही. शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकारी
अंगणवाडी सेविकांनी जिल्हाभरातून संकलित केलेली अशा संशयित महिला लाभार्थ्यांची माहिती महिला व बालविकास विभागाला सादर केल्यानंतर ही माहिती सरकार दरबारी पोहोचविण्यात आली. अपात्र महिला लाभार्थी निष्पन्न झाल्या असल्या, तरी माहिती कुठेही जाहीर होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी महिला व बालविकास विभागाकडून घेतली जात आहे. किंबहुना सरकारी पातळीवरूनच त्यांना तसे आदेश देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच महिला व बालविकास विभाग माहिती सरकारला पाठविल्याचे सांगत असला, तरी नेमक्या अपात्र महिला किती, हे मात्र उघड करायला तयार नाही.