त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा अमृतस्नानाचे स्थान असलेल्या कुशावर्त तीर्थासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीचे काम तीन महिन्यांपासून रेंगाळलेले आहे. या कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे भाविकांसह स्थानिक रहिवाशांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे शासन ३५ हजार कोटी रुपयांचा कुंभमेळा करीत असताना कुशावर्ताचे काम खासगी कंपनीच्या सीएसआर फंडामधून करीत आहे.
कुशावर्त तीर्थ ते संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर हा रहदारीसाठी महत्त्वाचा असलेला रस्ता खोदून ठेवल्यामुळे परिसरातील महावितरणचा वीजपुरवठा आणि नगर परिषदेचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. नागरिकांना दोन महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गटारांचे चेंबर उघडे आहेत, पाऊस सुरू झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
अत्यावश्यक स्थितीत रुग्णवाहिका येणे अशक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुरोहितांकडे पूजेसाठी आलेले भाविक आणि लॉजिंग व धर्मशाळेत मुक्कामाला असलेले भाविक, पर्यटक या सर्वांची तीन महिन्यांपासून मोठी गैरसोय होत आहे. याबाबत त्र्यंबक नगर परिषद अनभिज्ञ असून, संबंधित काम करणारी मक्तेदार संस्था त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत नगर परिषदेला पत्र देण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने रस्ते खोदून ठेवले असून, कामाच्या जागेवर कोणताही फलक नाही. त्यामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकही रात्री-अपरात्री या खोदलेल्या भागात पडून जखमी होत आहेत. काही ठिकाणी खोदलेला रस्त्याचे डेब्रीज काढलेले नाही. तुटलेल्या सळया बेसावधपणे रस्त्याने आलेल्या भाविकांना जखमी करीत आहेत. मात्र याबाबत संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
शहरात १०० कोर्टीचे गावठाणातील रस्ते बांधण्यात येत आहेत आणि आणखी शेकडो कोटी अंतर्गत रस्त्यांसाठी प्रस्तावित होत आहेत. तथापि कुंभमेळ्याचे मुख्य स्थान असलेल्या कुशावर्ताबाबत मात्र सीएसआर फंड घेतल्याचा आरोप होत असून, सीएसआर फंडातून होणाऱ्या कामाच्या दर्जाची हमी कोण देणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शासनाने कंभमेळ्याचे प्रमुख स्थान असलेल्या कुशावर्ताच्या स्वच्छतेची जबाबदारी खासगी कंपनीच्या सीएसआर फंडावर ठेवल्याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.