नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगावप्रमाणे नाशिक शहरातही जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत नाशिकमध्ये तब्बल १८ हजार जन्मदाखले बोगस असण्याची शक्यता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वर्तविली आहे.
येथे बोगस जन्म दाखले देणारी टोळी कार्यरत असल्याचा दावा करताना या दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी महापालिकेकडे केली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात दोन लाख ३३ हजार जन्म प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.
बोगस जन्मदाखल्यांच्या आधारे बांगलादेशी महाराष्ट्रात लपून बसल्याचा आरोप करत याविरोधात सोमय्या यांनी मोहीम उघडली आहे. मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच नाशिक महापालिका क्षेत्रातही बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्मप्रमाण पत्र देण्यात आल्याचा संशय व्यक्त करत सोमय्या यांनी सोमवारी (दि. १६) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालेगावप्रमाणे नाशिकमध्येही जन्म प्रमाणपत्र नोंदणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला.
शेख नायरा नुरमोहम्मद यांचा जन्म दाखला बोगस असल्याचे आपण पुराव्यानिशी सिद्ध केल्याचा दावा करताना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मालेगावातील तीन हजार ९७७ बोगस जन्म प्रमाणपत्रांप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, एक हजार ४३ जणांना आरोपी करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी केला. बोगस जन्मप्रमाणपत्रांविरोधातील मोहिमेंतर्गत आपण राज्यातील २५ महापालिकांना भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टिपू सुलतानची तुलना गद्दारी
केवळ वोट बँकसाठी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचे पातक काँग्रेसजनांकडून सुरू आहे. ही देशाशी, महाराष्ट्राशी गद्दारी आहे, असा आरोप करत भाजप हे कदापि मान्य करणार नाही, असे सोमय्या यांनी सांगितले. शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलेली चिंता रास्त असून, बांगलादेश आणि मुस्लीम माफियांकडून काही लोकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.