Kidney attack | धोकादायक किडनी अटॅक Pudhari File Photo
नाशिक

Kidney Disease | 100 पैकी 18 लोकांना किडनी आजाराचा धोका

Kidney Disease | सायलेंट किलर : ४० टक्के रुग्णांची मधुमेहामुळे किडनी होतेय निकामी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

शरीरातून नको असलेले घटक वेगळे करण्यासाठी 'फिल्टर'चे काम करणाऱ्या किडनीचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण भारतात १०० पैकी १८ लोकांना किडनीच्या आजाराचा धोका असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची किडनी निकामी होण्याची शक्यता अधिक असून, भारतात हे प्रमाण ४० टक्के इतके आहे. त्यामुळे स्वास्थ्य आयुष्यासाठी किडनीचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थुलता, धूम्रपान, व्यायामाचा अभाव अशा टाळता येणाऱ्या जीवनशैलीसंबंधित कारणांमुळे किडनी आजार झपाट्याने पसरत आहे. २०२३ मध्ये १३८ दशलक्ष भारतीयांना किडनी संबंधित आजाराचा त्रास झाल्याचे एका अभ्यासानुसार समोर आले होते.

२०२६ मध्ये हा आकडा अनेक पटीने वाढला असून, त्यात दिवसागणिक भर पडत आहे. तज्ज्ञांच्या मते, किडनी आजाराचे निदान पाचव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातच होत असल्याने, डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाशिवाय रुग्णांसमोर पर्याय उरत नाही. त्यामुळे किडनी या 'सायलेंट किलर' आजाराला रोखायचे असेल, तर नियमित आरोग्य तपासणी हाच पर्याय आहे.

वर्षातून एकदा आरोग्य तपासणीतून किडनी आजाराचे पहिल्या एक, दोन टप्प्यात निदान झाल्यास, या आजारातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. सद्यस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक असे रुग्ण आहेत, ज्यांना किडनी आजाराचे निदान शेवटच्या टप्प्यात झाले आहे. त्यामुळे या रुग्णांना अत्यंत कष्टप्रद आयुष्य व्यतीत करावे लागत आहे.

दोन लाख रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज

किडनी या आजाराचे निदान अंतिम टप्प्यातच होत असल्याने, किडनी सुमारे ८५ टक्के निकामी झालेली असते. अशात रुग्णासमोर डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हे दोनच पर्याय शिल्लक असतात. त्यातही डायलिसिसपेक्षा प्रत्यारोपण हा पर्याय उत्तम मानला जातो.

भारतात दरवर्षी दोन लाख २० हजार रुग्णांवर प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र, प्रत्यक्षात होणाऱ्या प्रत्यारोपणाचे प्रमाण खूपच कमी आहे. अमेरिकेनंतर भारत जिवंत दात्यांच्या किडनी प्रत्यारोपणात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तरीही मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्याने, लाखो रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.

किडनी या सायलेंट किलरला रोखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी हाच पर्याय आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब या रुग्णांनी विशेष खबरदारी घेऊन आपले आजार नियंत्रणात ठेवावे. गैरसमजूतीतून उपचार न करता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच उपचार घ्यावेत. अवयवदानाविषयी शंका-कुशंका बाजूला ठेवून अवयवदानास प्राधान्य द्यावे.
- डॉ. मोहन पटेल, नेफ्रोलॉजिस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT