दिंडोरी ( नाशिक ) : कादवा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलापोटी एफआरपीचा पहिला हप्ता २,८०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. यापूर्वी सुरुवातीला २,५०० रुपये मे. टनप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली होती. फरकाची रक्कम कारखान्याने उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शुक्रवार (दि. १९) पर्यंत एक लाख १८ हजार ३५३ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६३ टक्के मिळाला आहे. यातून एक लाख २५ हजार ७५० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्पही सुरू असून, आतापर्यंत इथेनॉलची आठ लाख ३७ हजार ८४४ लिटर, आर.एस. १३ लाख ७५ हजार ६२७ लिटरची निर्मिती करण्यात आली आहे.
सध्या साखर उद्योग बिकट परिस्थितीतून जात असतानाही कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना वेळेत एफआरपी देण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कादवाने कायम राखली आहे. यापुढेही जास्तीत जास्त ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले. हंगाम संपल्यानंतर शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार आहे. वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कादवा सहकारी साखर कारखाना कायम ठेवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ठरलेल्या ऊसतोडणी कार्यक्रमानुसार ऊसतोड करत कारखान्याच्या भवितव्यासाठी कादवा कारखान्यासच ऊसपुरवठा करावा, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.