नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलांच्या जिव्हाळ्याचा सण गौराईचा उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरणात गुरुवार (दि. १७) पासून सुरू असलेल्या ज्येष्ठा गौरी उत्सवाची सांगता शनिवारी (दि. १९) झाली. घरोघरी लाडक्या गौराईची उत्तरपूजा करीत साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. माहेरवाशिणी आलेल्या गौराईला 'सुख-समृद्धी देई ग माय, पुढल्या वरीस लवकर ये,' असा निरोप देताना महिलांसह भाविकांचे डोळे पाणावले होते.
सकाळपासूनच शहरातील विविध भागांत उत्तरपूजा, आरती आणि विसर्जनाची लगबग पाहायला मिळाली. अनुराधा नक्षत्रावर घरोघरी महालक्ष्मीचे थाटामाटात आगमन झाले होते. रांगोळीतून देव्हाऱ्यापर्यंत गौरीच्या पावलांचे ठसे उमटवित पारंपरिक गीते म्हणत गौराईचे स्वागत करण्यात आले होते.
मूल नक्षत्रावर शनिवारी (दि. १९) गौरी विसर्जनापूर्वी घरोघरी विधिवत उत्तरपूजा करण्यात आली. देवीची आरती करीत हळदी-कुंकू वाहण्यात आले. सौभाग्यवती महिलांनी खणा-नारळाने आणि लाडू-करंज्यांनी महालक्ष्मीची ओटी भरली. सासरी जाणाऱ्या लेकीला शिदोरी देण्याच्या प्रथेनुसार देवीला कानवले यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर जड अंतःकरणाने गौरीचे विसर्जन करण्यात आले.
गौरी विसर्जनासाठी रामकुंड, सोमेश्वरसह विविध ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देत अनेक भाविकांनी मनपाने उपलब्ध केलेल्या कृत्रिम तलावांच्या वापरास पसंती दिली.
शुक्रवारी (दि. १८) ज्येष्ठा गौरीसाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. यात पुरणपोळी, सोळा प्रकारच्या भाज्या, पंचपक्वान्न, कढी-भात, अळूची वडी, भजी, पापड, कुरडया आणि काही ठिकाणी ज्वारीच्या पिठाच्या आंबीलचा समावेश होता. सुवासिनींना जेवणासाठी आमंत्रित करीत त्यांचा हळद-कुंकू देऊन सन्मान करण्यात आला. सायंकाळी महिलांनी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले. एकमेकींना वाण देत उत्सवाचा आनंद साजरा केला. रात्री जागरण करीत देवीचे खेळ, गाणी म्हणत महिलावर्गाने उत्साहात रात्र घालवली.
तज्ज्ञांचे मत:ज्येष्ठा गौरीपूजनात देवीला अर्पण केलेला सोळा गाठींचा दोरक उस्थापनानंतर घरातील स्त्रियांनी गळ्यात धारण करावा. महालक्ष्मीचे प्रतीक मानला जाणारा हा दोरक अश्विन शुक्ल अष्टमीपर्यंत ठेवण्याची परंपरा आहे. गौरीपूजनातून स्त्रीशक्तीचा सन्मान, कुटुंबातील प्रेम, समाधान व समृद्धीचा संदेश ज्येष्ठा गौरीपूजनातून दिला जातो.- डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष धर्मशास्त्र तज्ज्ञ