जुने नाशिक : पावसामुळे जुन्या नाशिकमधील खडकाळी परिसरात बुधवारी (दि.20) रात्री दुमजली जुने घर कोसळून आठ जण गंभीर जखमी झाले. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये एका लहान बालकाचाही समावेश असून सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक घटनास्थळी धावले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू झाले. अग्निशामक दलाचे जवान, पोलिस कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन बचावकार्य हाती घेतले. मात्र घटनास्थळी झालेली प्रचंड गर्दी आणि अनेकांनी मोबाईलवर फोटो-व्हिडिओ काढण्याची घाई केल्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी, फायरमन , सोमनाथ थोरात, बी. डी. पाटील, इसाक शेख, एन. खोडे, डी. आर. लासुरे, नादिम शेख, छोटू कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात त्यांनी यश मिळवले. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी व सहकारी कर्मचारी यांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. वाहतूक व्यवस्थापन व जमाव नियंत्रण करून बचावकार्य सुरळीत पार पाडण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रफीक साबीर, राजेंद्र बागुल मदत कार्य करत होते.
या दुर्घटनेत नासीर खान(वय ५५), मोहसिना खान(वय ४०), अल्सा खान(वय २६), झारा खान(वय २२), मुदस्सीर खान(वय २१), आयेशा खान(वय १५), आयेशा शेख(वय १२), हसनैन शेख(वय ७) हे जखमी झाले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यातील जुन्या, मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक इमारती धोकादायक स्थितीत असून कुठल्याही क्षणी अपघात होऊ शकतो.