नाशिक : २०२३ मधील आगीची घटना ताजी असतानाच, बुधवारी (दि. २१) पहाटे जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत पुन्हा एकदा अग्नितांडव झाल्याने, फायर ऑडिट अहवालासह, औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नियमित केला जाणारा 'तपासणी अहवाल' संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच जिंदाल दुसऱ्यांदा आगीत खाक झाल्याचा आरोप शासकीय यंत्रणांकडून केला जात असला, तरी थातूरमातूर अहवालही जिंदालच्या अधोगतीचे कारण असल्याची चर्चा रंगत आहे.
इगतपुरीतील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला लागलेली आग तब्बल ५६ तासांनंतर आटोक्यात आणण्यात यश आले असले, तरी तिची धग अजूनही कायम आहे. या आगीत १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले असून, सुमारे ९० टक्के उत्पादन भक्ष्यस्थानी सापडले आहेत. या भयंकर घटनेत दिलासा देणारी बाब म्हणजे आगीपासून ३० ते ६० मीटरवर ठेवण्यात आलेल्या अतिज्वलनशील प्रोपेन गॅस टाकीपर्यंत आगीची धग जाऊ न देण्यास यंत्रणेला आलेले यश होय. जर या टाकीचा स्फोट झाला असता, तर संपूर्ण प्रकल्प खाक झाला असताच, शिवाय १५ किलोमीटरपर्यंत स्फोटाचा दूरगामी परिणाम भोगावा लागला असता. दरम्यान, २०२३ मध्ये लागलेल्या भीषण आगीच्यावेळीही 'जिंदाल'मध्ये अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेच्या घटनेत तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. आताच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा फायर ऑडिट रिपोर्टसह औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नियमित केला जाणारा तपासणी अहवाल संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्यावेळी उपस्थित केलेले तेच प्रश्न आतादेखील उपस्थित केले जात असून, 'यंत्रणांचा थातूरमातूर अहवाल आणि कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा' हेच आगीचे प्रमुख कारण असल्याची चर्चा आता रंगत आहे.
२०२३ मधील आगीच्या घटनेनंतर करण्यात आलेल्या 'फायर ऑडिट'मध्ये कंपनीत अत्याधुनिक अग्निप्रतिबंधक व्यवस्थेचा अभाव असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही कंपनी व्यवस्थापनाने अहवालातील या त्रुटीकडे दुर्लक्ष केले. तसेच औद्योगिक सुरक्षा विभागाकडून दरवर्षी केला जाणारा नियमित तपासणी अहवाल सोपस्कार पार पाडणारा ठरला आहे. या अहवालात एकदाही कंपनीतील त्रुटींवर बोट ठेवले गेले नाही. वास्तविक, आगीची घटना स्क्रॅपमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या तपासणी अहवालात 'स्क्रॅप'चा मुद्दा अग्रस्थानी असतो. मग, याविषयी औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनी व्यवस्थापनाला जाब का विचारला नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
२०२३ मध्ये लागलेल्या आगीत कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. यासाठी व्यवस्थापनाने विमा कंपनीकडे परतावा मागितला होता. मात्र, फायर ऑडिट रिपोर्टमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अनेक त्रुटी अधोरेखित केल्या गेल्यामुळे या विम्याचा परतावा अद्यापपर्यंत कंपनीला मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम सुमारे ४०० कोटी असल्याचेही समजते आहे.
औद्योगिक सुरक्षा विभागाकडून दरवर्षी जिंदाल कंपनीत तपासणी केली गेली. या तपासणीत हाउसकीपिंगसह मशीनरीची तपासणी, कामगार सुरक्षा आदींबाबतची पडताळणी केली गेली. मात्र, ज्या-ज्या वेळी तपासणी केली गेली, त्या- त्या वेळी सर्व काही आलबेल असल्याचे पथकांच्या निर्दशनास आले. वास्तविक, स्क्रॅपमुळे आगीची घटना घडली. मग हाउसकीपिंगमध्ये येणारा स्क्रॅपचा प्रकार निर्दशनास आला नाही काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आमच्या विभागाकडून नियमितपणे कंपनीची तपासणी केली गेली. मात्र, दरवेळी सर्व काही आलबेल असल्याचे निर्दशनास आल्याने तसा अहवाल कंपनी व्यवस्थापनाला दिला गेला. आता पुढील दोन दिवसांत आगीच्या घटनेबाबतची सखोल चौकशी सुरू होणार असून, त्यात नेमके कारण समोर येईल.अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग