जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले Pudhari News Network
नाशिक

Jindal Poly Films Fire News | 'जिंदाल'ला क्लोजर; पाच हजार कामगारांवर उपासमार

भीषण आगीवरून चौकशीचा सिसेमिरा : उत्पादने थांबविण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून, पंचक्रोशीतील नागरिकांच्या जीविताचादेखील प्रश्न निर्माण झाला होता. तब्बल ५६ तास आग धुमसत असल्याने, सर्वांनाच घाम फुटला होता.

२०२३ च्या भीषण आगीची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा 'जिंदाल' आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे अधोरेखित करीत प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीला क्लोजर नोटीस बजावली असून, उत्पादने थांबविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे पाच हजार कामगारांवर उपासमार ओढावण्याची शक्यता आहे.

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले असून, सुमारे ९० टक्के उत्पादन भक्ष्यस्थानी सापडले आहे. या भयंकर घटनेत दिलासा देणारी बाब म्हणजे आगीपासून ३० ते ६० मीटरवर ठेवण्यात आलेल्या अतिज्वलनशील प्रोपेन गॅसच्या टाकीपर्यंत आगीची धग जाऊ न देण्यास यंत्रणेला आलेले यश होय. जर या टाकीचा स्फोट झाला असता, तर संपूर्ण प्रकल्प खाक झाला असताच, शिवाय १५ किमीपर्यंत स्फोटाचे दूरगामी परिणाम भोगावे लागले असते. दरम्यान, २०२३ मध्ये लागलेल्या भीषण आगीच्यावेळीही 'जिंदाल'मध्ये अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळच्या घटनेत तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. आताच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

या घटनेच्या सखोल चौकशीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि औद्योगिक सुरक्षा विभाग यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. एमपीसीबीने कंपनीच्या आसपासच्या चार गावांमध्ये हवामान, जलप्रदूषण व इतर घटकांचे निरीक्षण सुरू केले आहे. तीन गावांचे मॉनिटरिंग पूर्ण झाले असून, उर्वरित एका गावाचे परीक्षण मंगळवारी (दि. २७) पूर्ण करण्यात आले आहे. संबंधित अहवाल या आठवड्याअखेरपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याची माहिती एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. दुसरीकडे, औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे. विभागाच्या तपासणी पथकाने घटनास्थळी भेट देऊन सुरुवातीचा अहवाल तयार केला असून, महिनाभरात तपशीलवार अहवाल सादर केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. अंजली आडे यांनी दिली आहे.

सखोल चौकशीची स्थानिकांची मागणी

मुंढेगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण करत आहेत. सुरक्षाविषयक नियमांचे पालन न केल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला असून, यासंबंधी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. प्रशासन सध्या सतर्क असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना, सुरक्षा ऑडिट व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून दिले जात आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

260 एकरांत कंपनीचा विस्तार

कंपनीत सुमारे ३,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, कंपनीचा विस्तार सुमारे २६० एकर क्षेत्रावर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली असताना सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रशासनाच्या विविध विभागांचादेखील हलगर्जीपणा असल्याचा संशय असून, त्या अनुषंगानेदेखील चौकशी केली जाणार आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाच्या तपासणी पथकाने घटनास्थळी भेट देऊन आगीचे नेमके कारण काय? याचा तपास केला जात आहे. महिनाभरात तपशीलवार अहवाल तयार करत वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. कंपनी व्यवस्थापनाला कंपनी बंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, इगतपुरी, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT