नाशिक : नागरी प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे- मनसेने संयुक्तपणे काढलेल्या जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व करताना नेते. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Janaakrosh Mahamorcha : भ्रष्टाचार, ड्रग्ज, गुन्हेगारी, खड्ड्यांविरोधात जनआक्रोश

ठाकरे सेना-मनसेचे संयुक्त मोर्चातून शक्तीप्रदर्शन : भाजपला थेट आव्हान

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • काळे झेंडे, घोषणाबाजीने वेधले लक्ष ; संयुक्त मोर्चाच्या टोप्या घालून नागरिक सहभागी

  • राऊत-नांदगावकर खांद्याला खादा लावून मोर्चात; ‘ठाकरे ब्रॅण्ड’ची कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

  • फलकांमधून वेधले नाशिकमधील प्रश्न; मयत राहुल धोत्रेंच्या कुटुंबियांचा मोर्चात सहभाग

नाशिक : भ्रष्टाचार, हनी ट्रॅप, ऑनलाइन फसवणूक, अंमली पदार्थांची सर्रास विक्री, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग, महिला सुरक्षेचा प्रश्न, कामगारांचे हक्क, बेरोजगारीचा विस्फोट, आदिवासींची पिळवणूक, सिंहस्थ कामांतील अन्याय, गुन्हेगारांना राजकीय आश्रय आणि खड्डेमय रस्ते या सर्व मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढत भाजप सरकारला थेट आव्हान दिले. या मोर्चात सहभागी शेकडो नागरिकांनी हातात फलक घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

उबाठा गट आणि मनसेच्यावतीने शुक्रवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त जनआक्रोश मोर्चा नेण्यात आला. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर यांनी मोर्चाचे नेतृत्व करत, नाशिककरांच्या प्रश्नांवरून थेट भाजप महायुती सरकारवर ताशेरे ओढले. बी. डी. भालेकर मैदानावरुन मोर्चा मार्गस्थ झाला. दुधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, एमजी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चात सहभागी पुरुषांसह महिलांनी हातात फलक, काळे झेंडे, काळे कपडे तसेच डोक्यावरील टोपीने नाशिककरांचे लक्ष वेधले. मोर्चात दोन्ही सेनेचे नेते सहभागी झाल्याने, कार्यकर्त्यांना चांगलाच हुरूप आल्याचे दिसून आले. सरकारविरोधात तुफान घोषणाबाजी करीत मोर्चेकऱ्यांनी मागण्या मांडल्या. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, मनसे नेते डॉ. प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, ठाकरे सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वंसत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आदी स्थानिक नेते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांमध्ये युतीचा ‘फिव्हर’

मोर्चातील कार्यकर्त्यांमध्ये युतीचा फिव्हर दिसून आला. कार्यकर्त्यांनी उद्धव - राज तसेच आदित्य, अमित ठाकरे यांचे कटआऊट असलेले फलक उंचावून घोषणाबाजी केली. काहींनी उद्धव आणि राज यांची छबी असलेले गॉगल परिधान केले होते. त्यामुळे ठाकरे ब्रॅण्ड एकत्र आल्याची कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

नाशिककरांच्या प्रश्नांचा भस्मासूर

राक्षसाची वेशभुषा करून मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. काळ्या कपडे परिधान केलेल्या या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शरीरभर विविध प्रश्नांचे फलक लावले होते. हातात गदा घेऊन हा कार्यकर्ता मोर्चात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत छबी टिपण्यासाठी अनेकजण पुढे येत होते.

मोर्चेकऱ्यांना अल्पोपहार

मोर्चेकऱ्यांना मसाले भात आणि शिरा असा अल्पोपहार देण्यात आला. बी. डी. भालेकर मैदानावर ही व्यवस्था केली होती. दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चेकऱ्यांची व्यवस्था राखली.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त

मोर्चाभोवती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. साध्या वेशात काही पोलिस मोर्चात सहभागी झाले होते. याशिवाय वाहतूक पोलिसांनी वाहतुकीवर फारसा ताण पडू न देता, वाहने अन्यत्र वळविली होती. त्र्यंबक नाका ते खडकाळी सिग्नलपर्यंत वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. मात्र, पोलिसांनी लगचेच वाहतूक मोकळी केली.

ट्रक, जीप, बसेसमधून मोर्चेकरी

शहर व जिल्ह्यातून ट्रक, जीप आणि बसेसमधून मोर्चेकऱ्यांना आणण्यात आले होते. भालेकर मैदानावर मोर्चेकऱ्यांना सोडून सर्व वाहने ईदगाह मैदानावर पार्क केली होती.

फलकांनी वेधले लक्ष

मोर्चात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसह डिजिटल अरेस्ट, हनी ट्रॅप स्कॅम, मुख्यमंत्री रोजगार हमी योजना व जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार आदींचे फलक झळकलेत. तसेच ‘राहुल धोत्रे अमर रहे’ असे फलक त्याच्या कुटुंबियांनी झळकविल्याने, त्याकडे नाशिककरांचे लक्ष वेधले गेले.

जेव्हा जनता रस्त्यावर उतरते तेव्हा त्या राज्याचा नेपाळ होतो. महाराष्ट्राची काहीशी अशीच स्थिती असून, सरकारने आता जनतेचा अंत पाहू नये. भाजपचे संकटमोचक महाजन राहुल धोत्रेच्या मारेकऱ्याला बंगल्यावर बोलावतात. मात्र, मारेकरी पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संयुक्तपणे आम्ही महाराष्ट्रभर मोर्चे काढणार आहोत.
संजय राऊत, खासदार, ठाकरे सेना
‘ये तो झाक है, बहुत कुछ बाकी है’ ज्यांच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्रात मोठे झालात, त्यांना तुमच्या कितीही पिढ्या खाली उतरल्या तरी संपवू शकणार नाही. राज आणि उद्धव एकत्र आलेत तर तुमचे काय होणार याचा विचार करा. तुम्ही इकडून - तिकडून जमवत आहात. आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ. नागरी प्रश्नांवर लक्ष देऊ.
बाळा नांदगावकर, मनसे नेते
मनसेच्या सत्ता काळात ‘सीएसआर’मधून सुरू केलेले प्रकल्प बंद करण्यात आलेत. त्याकाळात शहरात एकही खड्डा नव्हता. आज संपूर्ण शहर खड्ड्यात गेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेले शस्त्रसंग्रहालय देखील बंद केले आहे. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे.
आनंद अभ्यंकर, प्रवक्ते, मनसे
वाइनसाठी प्रसिद्ध असलेले शहर आज हनीसाठी प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे डॅडी फडणवीस यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकचे काय झाले? जे प्रकल्प होते, त्याची वाट लावण्याचे काम भाजपने केले. कुसुमाग्रजांची नगरी, ड्रग्ज माफीयांची नगरी झाली आहे. त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उतरून गुन्हेगाराला चोप देऊ.
संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे
ठाकरे ब्रॅण्ड एकत्र आल्याने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पुढचा काळ ठाकरे बंधुंचा आहे. तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकला हनीट्रॅप, खड्डे, ड्रग्ज, भ्रष्टाचार यासाठी बदनाम केले आहे. संकटमोचक गिरीष महाजन दोन दिवसांत खड्डे बुजविण्याची भाषा करतात. ही वेळ तुमच्यावर का आली याचा त्यांनी विचार करायला हवा.
दिनकर पाटील, प्रदेश सरचिटणीस, मनसे.
भाजपने नाशिकची अवस्था प्रचंड बिकट केली असून, आदिवासी बांधवांना महिनाभरापेक्षा अधिक काळ उपोषण करावे लागणे, यापेक्षा दुदैव काय असू शकते. आता या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार असून, त्याचा जाब भाजप सरकारला विचारणार आहोत. मोर्चानंतरही आम्ही नाशिकच्या प्रश्नांवर भांडणार आहोत.
डी. जी. सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख, ठाकरे सेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT