नाशिक : जम्मू- काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील 76 पर्यटकांच्या सुरक्षेची जिल्हा प्रशासनाकडून खात्री करण्यात आली असून, हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत. 76 पैकी 50 पर्यटक हे ट्रॅव्हल एजन्सीमार्फत पर्यटनासाठी गेलेले असून, त्यांनी पर्यटन सहल पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
भारतीय लष्कराच्या सुरक्षेवर त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, सहल पूर्ण झाल्यानंतर ट्रॅव्हल एजन्सीमार्फत ते परतणार आहेत. तर 25 पर्यटकांचे परतीचे तिकीट आरक्षित असून, ते 26 एप्रिलपर्यंत विमानसेवा तसेच रेल्वेने नाशिकमध्ये येतील. उर्वरित एक जण निवृत्त सहायक पोलिस आयुक्त असून, त्यांनीदेखील भारतीय लष्कराच्या सुरक्षेवर विश्वास व्यक्त करीत पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतरच परतणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.
25 पर्यटक 26 एप्रिलपर्यंत परणार
4 पर्यटक - 24 एप्रिलला विमानाने परतणार
11 पर्यटक - 25 एप्रिलला रेल्वेने परतणार.
7 पर्यटक अहिल्यानगरचे
10 पर्यटक - 26 एप्रिलला विमानाने श्रीनगरहून मुंबईला परतणार
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील 76 पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरवणीवर आला. या 76 पर्यटकांना सुरक्षितरीत्या परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाने नाशिकमधील ट्रॅव्हल एजन्सीकडून काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री करत त्यांच्या परतण्याची माहिती घेतली. 76 मधील 50 पर्यटक हे विविध ट्रॅव्हल एजन्सीमार्फत जम्मू- काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत. ते आपली पर्यटन सहल पूर्ण करूनच माघारी परतणार आहेत. या सर्व 76 पर्यटकांनी भारतीय लष्कराच्या सुरक्षाव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून 0253-2317151 (नाशिक जिल्ह्याकरिता) हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. गत दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून एकूण 80 ट्रॅव्हल एजन्सीशी नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधण्यात आला. त्यात 50 पर्यटक टॅव्हल्स कंपन्यांसोबत गेल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 26 पर्यटक स्वतंत्ररीत्या गेले होते. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला.