जळगाव/भुसावळ: नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उत्सवाच्या काळातच जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांची साखळी सुरू असल्याचे दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून आणि गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच, यात आणखी एका खुनाची भर पडली आहे. जळगाव येथील तरुणाचा भुसावळ शहराजवळ, कंडारी येथे 5 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राजेंद्र साळुंखे कोळी (वय 40, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जितेंद्र साळुंखे हे जळगावात पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते आणि ते हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
जितेंद्र साळुंखे हे एका कामाच्या निमित्ताने जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा आणि इतर दोघांसह भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे गेले होते. कंडारी येथील एका हॉटेलवर चौघे जण एकत्र बसले होते. तिथे मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात अचानक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारी वाढल्यानंतर, इतर तिघांनी मिळून जितेंद्र साळुंखे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्यांना जागीच संपवले.
गंभीर जखमी अवस्थेत जितेंद्र यांना भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने तात्काळ तपास सुरू केला.
जितेंद्र साळुंखे यांचा मृतदेह भुसावळ येथील सरकारी रुग्णालयात (जी.एस.) हलवण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे आणि खुनाच्या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्याचे काम भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते.
जळगाव शहरात नुकताच किरकोळ कारणावरून तलवारी व कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता, तर त्यानंतर कुसुंबा गावात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनांमधील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत, तोच ही खुनाची ताजी घटना समोर आल्याने जळगाव जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांसमोर गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.