Gulabrao Patil Pudhari
नाशिक

Jalgaon Tribal Welfare News | आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; जळगावमध्ये जनजातीय गौरव सप्ताह

Jalgaon Tribal Welfare News | पालकमंत्री गुलाबराव पाटील : जनजातीय गौरव सेवा सप्ताहात विविध उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

जळगाव (पुढारी वृत्तसेवा):

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त दि. ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित 'जनजातीय गौरव सेवा सप्ताहा'च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

आदिवासी बांधवांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वयंसोजगार आणि मूलभूत सुविधांसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर देत या सप्ताहात एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहप्रकल्प अधिकारी प्रवीण दामाडे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

साडेबारा कोटींच्या पाणी योजना

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, सप्ताहानमित्त जिल्ह्यातील आदिवासी पाडे - वस्त्यांवरील उर्वरित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या योजना राबवणार आहेत.

तसेच रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील सुमारे ७० आदिवासी गावे व पाड्यांमध्ये सौर ऊर्जाने वीजपुरवठा करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देणार आहेत.

वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत. विशेषतः आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमियाची तपासणी व जनजागृतीवर भर द्यावा. तसेच शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

आदिवासी भागातील विकासासाठी 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' अंतर्गत केंद्र सरकारकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. सर्व विभागांच्या समन्वयाने हा सेवा सप्ताह प्रभावीपणे राबवणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, सात शासकीय वसतिगृहे आणि नऊ आश्रमशाळांमध्ये अध्यावत अभ्यासिका आणि हीटपंर, तर प्रत्येकी १७ वसतिगृहे आणि आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही व इन्व्हर्टर, सहा वसतिगृहे आणि सात आश्रमशाळांचे सौर ऊर्जेने विद्युतीकरण, १७ आश्रमशाळांमध्ये डिजिटल बोर्ड, तर ११ आश्रमशाळांच्या नवीन इमारतींची कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.

सप्ताहातील उपक्रम

  • दि. ११ व १२ नोव्हेंबर: पत्रकार परिषदेद्वारे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

  • दि. १३ नोव्हेंबर: लाभार्थ्यांना लाभवाटप, महिला बचतगट व स्वयंसोजगार मार्गदर्शन.

  • दि. १४ नोव्हेंबर: आदिवासी महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता, दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम.

  • दि. १५ नोव्हेंबर: भगवान बिरसा मुंडा जयंती व उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान.

  • दि. १६ नोव्हेंबर: आधारकार्ड, शासकीय कागदपत्रे व योजनांसाठी विशेष शिबिरे.

  • दि. १७ नोव्हेंबर: आरोग्य तपासणी व पोषण आहार जनजागृती.

  • दि. १८ नोव्हेंबर: रोजगार, कौशल्यविकास, शिष्यवृत्ती, स्वयंसोजगार व आर्थिक साक्षरता मार्गदर्शन उपक्रम होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT