Satara Gun Case  File Photo
नाशिक

Jalgaon Shooting Case | गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; शनिपेठ पोलिसांची कार्यक्षमता प्रश्नचिन्हात

Jalgaon Shooting Case | शनिपेठ परिसरातील कांचननगर येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबार प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुणाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पुढारी वृत्तसेवा

जळगाव (पुढारी वृत्तसेवा): शनिपेठ परिसरातील कांचननगर येथे शनिवारी (९ नोव्हेंबर) रात्री उशिरा झालेल्या गोळीबार प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुणाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मात्र, या घटनेने स्थानिक शनिपेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, कारण हद्दपार आरोपी खुलेआम शहरात फिरत होते आणि पोलिसांना त्याची खबरही नव्हती!

घटनेत मृत्यू झालेला तरुण आकाश ऊर्फ टपऱ्या युवराज कोळी हा निरपराध होता. ९ नोव्हेंबरच्या रात्री १०.१५ च्या सुमारास कांचननगरमधील प्रशांत चौकात दोन हद्दपार आरोपी आकाश ऊर्फ डोया सपकाळे आणि गणेश ऊर्फ काल्या सोनवणे यांच्यात किरकोळ वाद झाला. वाद एवढा वाढला की, आकाश सपकाळेने विकी चौधरी आणि करण पाटील यांच्या मदतीने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. पहिली गोळी गणेश सोनवणेच्या हाताला लागली, पण दुसरी गोळी तिथे उपस्थित असलेल्या आकाश कोळीच्या छातीत घुसली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर आरोपी सपकाळे, पाटील आणि चौधरी घटनास्थळावरून पसार झाले. विशेष म्हणजे, हे आरोपी काही महिन्यांपूर्वी जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेले होते. तरीही ते शनिपेठसारख्या संवेदनशील भागात निर्भयपणे फिरत होते, ही गोष्ट पोलिसांच्या लक्षातच आली नाही. स्थानिक नागरिकांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घटनेनंतर चार दिवसांपर्यंत शनिपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. तपास ‘नावालाच’ चालू असल्याची चर्चा शहरात सुरु होती. अखेर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपी आकाश ऊर्फ डोया सपकाळे आणि करण पाटील यांना अटक केली.

या अटकेमुळे स्थानिक पोलिसांच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. हद्दपार आरोपी शहरात कसे फिरत होते? त्यांना ‘आश्रय’ कोण देत होते? आणि त्यांना पोलिस हालचालींची खबर कोण देत होते? या सर्व प्रश्नांवर आता संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “जर पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती, तर एका निरपराध तरुणाचा जीव वाचला असता.”

या घटनेचा तपास शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक कावेरी कमलाकर हे करीत असून, आरोपींकडून शस्त्रसाठा आणि गुन्ह्याशी संबंधित पुरावे मिळवण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. नागरिकांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या बीट अमलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या जळगाव शहरात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याच्या घटना वाढत असून, हद्दपार आरोपींच्या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून अशा गुन्हेगारांवर तातडीने नियंत्रण मिळवून शहरात कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT