जळगाव पोलिसांकडून ७०९.२८० किलो गांजाची अधिकृतरीत्या विल्हेवाट
एनडीपीएस कायद्यान्वये दाखल १९ गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट
जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत शासकीय पंचांच्या उपस्थितीत कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची प्रक्रिया
सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पारदर्शक कार्यवाही
जळगाव | प्रतिनिधी
मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या आणि अंमली पदार्थविरोधी कायदा (एनडीपीएस) अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ७०९.२८० किलो गांजाची जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे २४ रोजी अधिकृतरीत्या विल्हेवाट लावण्यात आली. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत मोठा खड्डा खोदून, शासकीय पंचांच्या उपस्थितीत हा संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये दाखल असलेल्या एकूण १९ गुन्ह्यांमध्ये हा गांजा जप्त करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या सूचनांनुसार जळगाव जिल्हा घटकासाठी विशेष जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली जप्त मुद्देमालाबाबतची सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयीन व प्रशासकीय परवानगीनुसार हा गांजा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रक्रियेदरम्यान समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, सहाय्यक कृषी अधिकारी अविनाश खैरनार तसेच वजनमापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार ही कारवाई पारदर्शकपणे पार पाडण्यात आली.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक फौजदार संजय दोरकर, संदीप पाटील, सुनील दामोदरे, संदीप चव्हाण, जयंत चौधरी, राहुल बैसाने, रवींद्र चौधरी, नीता राजपूत तसेच वाहनचालक दर्शन ढाकणे यांचा समावेश होता.