Jalgaon Crime News  
नाशिक

Jalgaon Crime News | एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Jalgaon Crime News | जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Crime News

जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. शिताफीने रचलेल्या सापळ्यातून पोलिसांनी या टोळीतील दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून, त्यांच्या कडून सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एलईडी टीव्ही, फ्रिज, कूलर आणि दैनंदिन घरगुती साहित्याचा समावेश आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात लक्ष्मी नगर परिसरातील रहिवासी राजेंद्र दुसाने यांच्या घरफोडीपासून झाली. दुसाने कुटुंबासह गेल्या दोन महिन्यांपासून पुणे येथे वास्तव्यास होते. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ जळगावला परत येऊन पाहणी केली असता, घरातील महागड्या वस्तूसह घरगुती भांडी, गॅस शेगडी, गॅस हंडी, तांबे-पितळी भांडी आणि इतर सामान चोरीला गेल्याचे उघड झाले.

त्यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ८२८/२०२५ भा.द.वि. कलम ३०५(a) आणि ३३१ (३)(४) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने विशेष पथक तयार केले. या पथकात पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, किरण चौधरी, किशोर निकुंभ, प्रमोद लाडवंजारी, गणेश शिरसाळे, शशिकांत मराठे आणि नरेंद्र मोरे यांचा समावेश होता.

गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. लक्ष्मी नगर भागात संशयितांची हालचाल वाढल्याचा त्यांना ठाव लागला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा साथीदार राहुल सुपडू चौधरी तसेच एका अल्पवयीन मुलासह त्यांनी ही चोरी केल्याचं उघड झालं.

चोरी केलेल्या वस्तू ते विविध ठिकाणी विकण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, फ्रिज, कूलर, गॅस शेगडी, भांडी आणि इतर साहित्य असा एकूण रु. ५२,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय गुन्हा करताना वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

या संपूर्ण यशस्वी कारवाईचे श्रेय एमआयडीसी पोलिसांच्या सुयोग्य नियोजनाला आणि तत्परतेला दिले जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या चोरी प्रकरणामुळे परिसरात निर्माण झालेली भीती आता काहीशी कमी झाली असून, बंद घरांना लक्ष्य करत चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मिळालेले यश महत्त्वाचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT