कांदा दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता pudhari news network
नाशिक

Lasalgaon Onion Market | कांदा उत्पादक शेतकरी संकटात! युद्धाच्या ठिणगीमुळे लासलगाव बाजार समितीत दरात मोठी घसरण

Lasalgaon Onion Market | युद्धाचा परिणाम : कंटेनर वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढल्याने निर्यात मंदावली

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : राकेश बोरा

अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका देशातील कांदा निर्यातीला बसत असून, आखाती देशांकडे होणारी निर्यात तब्बल ४५ टक्क्यांनी घटल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढल्याने निर्यात मंदावली आहे. तरीही 'हम भी किसीसे कम नहीं' अशी भूमिका घेत कांदा निर्यातदारांनी मार्च २०२६ मध्ये सुमारे ३५० कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात केली.

मात्र, मार्च २०२५ मध्ये हीच संख्या सुमारे ६०० कंटेनरपर्यंत होती. कृषिमाल निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरही कांदा निर्यात सुमारे ३५ टक्क्यांनी घटली आहे. या घडामोडींचा थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याच्या दरावर झाला आहे.

मार्च २०२६ मध्ये उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त १५०० रुपये प्रतिक्विंटल, तर लाल कांद्याला १४१७ रुपये दर मिळाला. याउलट मार्च २०२५ मध्ये उन्हाळ कांद्याला २६२७ रुपये आणि लाल कांद्याला ३१०१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले होते. दरातील या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सुरू असलेले युद्ध शनिवारी ३६ व्या दिवशी पोहोचले असून, कंटेनर वाहतुकीच्या भाड्यात तब्बल दहापट वाढ झाली आहे. पूर्वी आखाती देशांसाठी कंटेनरचे भाडे ६०० ते ७०० डॉलरदरम्यान होते, ते आता सुमारे ६५०० डॉलरपर्यंत वाढले आहे. परिणामी, निर्यात अधिक खर्चिक बनली आहे.

याचवेळी यमन, इजिप्त आदी देशांतून ट्रकद्वारे कमी दरात कांदा आखाती बाजारात पोहोचत असल्याने भारतीय कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंटेनर भाडेवाढ नियंत्रणात आणावी तसेच कांदा निर्यातीसाठी किमान १० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा निर्यातदार व लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी केली आहे.

सध्याच्या दरातून उत्पादन खर्चही निघत नाही. मुलांचे शिक्षण, लग्न व घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. केंद्राने आखाती देशांसह नवीन बाजारपेठा शोधून कांदा निर्यात वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
रामभाऊ भोसले, उत्पादक शेतकरी
लासलगावसह जिल्ह्यात 66 अवकाळी व गारपिटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यातच युद्धामुळे निर्यात घटली आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- ज्ञानेश्वर जगताप, सभापती, बाजार समिती, लासलगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT