नाशिक : आसिफ सय्यद
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे आणि जागतिक स्तरावरील औद्योगिक केंद्र म्हणून अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' या स्वतंत्र गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या माध्यमातून राज्याला २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या ध्येयाला बळ देणे आणि २०४७ पर्यंत 'विकसित महाराष्ट्र' संकल्पना साकार करण्याचा शासनाचा उद्देश आहे.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) सुमारे ५१ लाख कोटी रुपयांचा वाटा असून, देशातील औद्योगिक उत्पादनात राज्याचा १५.४ टक्क्यांहून अधिक सहभाग आहे. गेल्या दशकात देशात आलेल्या एकूण परकीय थेट गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ३१ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी स्थापन केलेल्या गुंतवणूक प्रोत्साहन संस्थांच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही स्वतंत्र संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने ही संस्था कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ती पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असेल. महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत ही संस्था कार्यरत राहणार आहे. राज्य सरकारने या उपक्रमासाठी ३ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीस मान्यता दिली आहे. यापैकी १ हजार कोटी रुपये 'कॅटॅलिटिक फंड' म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे. उदयोन्मुख आणि उच्च क्षमतेच्या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे.
मुख्यमंत्री अध्यक्ष, उद्योगमंत्री उपाध्यक्ष
या संस्थेच्या प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. उपमुख्यमंत्री - सहअध्यक्ष आणि उद्योगमंत्री उपाध्यक्ष असतील. मुख्य सचिव, विविध विभागांचे वरिष्ठ सचिव, विकास आयुक्त (उद्योग) यांच्यासह उच्चस्तरीय यंत्रणा या संस्थेच्या धोरणात्मक मार्गदर्शनासाठी कार्य करेल
देश-विदेशात रोड शो, दूतावासांशी समन्वय
संस्थेच्या कार्यात देश-विदेशात रोड शो आयोजित करणे, संभाव्य गुंतवणूकदार शोधणे, विविध देशांच्या दूतावास आणि उद्योग संघटनांशी संपर्क वाढवणे, बाजारपेठेचे विश्लेषण करणे, सामंजस्य करारांचे व्यवस्थापन करणे तसेच महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूक व्यवस्थापन म्हणून ब्रँडिंग करणे यांचा समावेश असेल.
महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न
तज्ज्ञांच्या मते, देशातील आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र, व्यावसायिक आणि समर्पित गुंतवणूक प्रोत्साहन संस्था उभारल्याने महाराष्ट्राची गुंतवणूक क्षमता आणखी वाढेल. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांशी स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे..
गुंतवणूकदारांसाठी 'सिंगल फेस' संस्था
'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' ही संस्था गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन, सल्ला, गुंतवणूक प्रक्रियेत सहाय्य, प्रकल्पानंतरचे समर्थन आणि विविध विभागांशी समन्वय साधण्याचे काम करणार आहे. एमआयडीसी, मैत्री, उद्योग संचालनालय, एमआयटीएल आणि इतर शासकीय संस्थांशी समन्वय साधून गुंतवणूकदारांच्या सर्व गरजांची पूर्तता केली जाईल.
'इन्व्हेस्ट महाराष्ट्र'ची प्रमुख उद्दिष्टे
महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करणे
देशी आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे
गुंतवणूकदारांना सुलभ सेवा व मार्गदर्शन
रोड शो, गुंतवणूक परिषद व जागतिक संपर्क वाढवणे
उदयोन्मुख क्षेत्रांसाठी विशेष निधी उपलब्ध करणे
२०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याला गती देणे