नाशिक : निल कुलकर्णी
बुद्धिबळ हा केवळ 'ल्युडो'सारखा 'गेम' नसून बुद्धिकौशल्याचा आंतरराष्ट्रीय खेळ आहे. या खेळाबद्दल जनमानसात जागृतीचा अभाव, स्थानिक पातळीवर कमी झालेल्या स्पर्धा आणि पाल्याला या खेळाकडे पाठवण्यासाठी पालकांचा उदासीन दृष्टिकोन यामुळे गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये बुद्धिबळ खेळाडूंचे प्रमाण झपाटयाने घटले.
कोविडनंतर पुन्हा या खेळाने भरारी घेतली असून, नाशिकमध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे प्रशिक्षण देणाऱ्या 'कोचिंग'संस्थांसह वाढलेल्या स्पर्धा यामुळे शहरात 'मास्टर्स' खेळाडू तयार होत असल्याचे आश्वासक चित्र आहे.
'कोविड'पूर्वी बुद्धिबळ खेळाविषयी जनमानसात उदासीनता होती. कोविड काळात अन्य सर्व खेळ बंद झाल्याने बुद्धिबळ खेळण्याकडे मुलांचा कल वाढला. समय रैना आदींसारख्या 'स्ट्रिमर्स'ने या खेळाला लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वेबसिरीजनेही 'चेस' ला अधिक लोकप्रिय केले. नवपालकांमध्ये या खेळाविषयी जागृती वाढल्याने त्यांनी आपल्या पाल्यांना 'चेस' कडे वळवले.परिणामी, गेल्या पाच वर्षांतच शहरात या खेळाविषयी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले.
आज शहरात सुमारे अडीच हजार खेळाडू या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. बुद्धिबळाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची आणि नाशिकमध्ये होणाऱ्या चेस स्पर्धांचीही संख्या लक्षणीय वाढली. आज नाशिकचा सर्वात छोटा खेळाडू वल्लभ चव्हाणने आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवले आहे. तो अवघा सहा वर्षांचा आहे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही खेळाबदद्ल जागृती निर्माण करण्यास प्रारंभ केल्याने नाशिक बुद्धिबळ खेळात अग्रेसर होत असून, येथून 'ग्रॅण्डमास्टर्स'ही वाढतील, अशी अपेक्षा शहरातील कोचिंग संस्थांच्या संचालकांनी व्यक्त केली
बुद्धिबळपटू राज्य, राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळून 'ग्रॅण्ड मास्टर्स' होतात. कोविडपूर्वी नाशिकमध्ये बुद्धिबळांच्या स्पर्धाच होत नसे. त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेचे व्यासपीठ अन् वर जाण्यासाठी शिडीच तयार नव्हती. आज स्पर्धा आयोजित करणाऱ्यांची संख्या वाढली. शहरात उत्तम कोचिंग देणाऱ्या संस्थाही वाढल्या. पालकांमध्ये या खेळाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. म्हणून बुद्धिबळपटू वाढत आहेत.वरद देव, बुद्धिबळ प्रशिक्षक
ग्रॅण्डमास्टर -१
बुद्धिबळपटू -२५००
कोचिंग संस्था -१५
जागतिक बुद्धिबळ दिनाच्या निमित्ताने शहरात रविवारी (दि.२०) विविध ठिकाणी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रेव्होल्यूशनरी चेस क्लबतर्फे विबग्योर इंटरनॅशनल स्कूल, समर्थ नगर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. बॉटविनिक चेस स्कूल नाशिक आणि आर. के. कलानी ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९.३० वाजेपासून तपोवन लिंक रोडवरील रामीबाई भवन येथे जलद बुद्धीबळ स्पर्धा होत आहेत.
रेव्होल्यूशनरी चेस क्लब तर्फे आयोजित स्पर्धेत एकूण ३० हजार रुपयांची रोख पारितोषिके व यासह ६० ट्रॉफींचे वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, विविध वयोगटांसाठी स्वतंत्र पारितोषिकांची व्यवस्था असणार आहे. त्यात ७, ९, ११, १३, आणि १५ अशा वयोगटाखालील खेळांडूंसाठी स्वतंत्र ट्रॉफी आणि भरगोस बक्षिसे वितरीत होणार आहेत. अनरेटेड म्हणजेच रेटिंग नसलेल्या खेळाडूंसाठी स्वतंत्रपणे ८ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत, ज्यामुळे नवोदित खेळाडूंनांही विजेतेपद पटकावण्याची संधी उपलब्ध आहे.