नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नवसाला पावणाऱ्या जगप्रसिद्ध बाल येशूच्या यात्रेसाठी देश-विदेशातून सुमारे दोन लाख भाविकांनी शनिवारी (दि. १४) प्रभूचरणी लीन होत दर्शनाचा लाभ घेतला. दोन दिवस चालणाऱ्या या मुख्य यात्रा सोहळ्यात परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
रविवारी (दि. १५) यात्रेचा समारोप होणार आहे. उपनगरमधील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारात असलेल्या बाल येशू मंदिर परिसरात खेळणी, शोभेच्या वस्तू, मेणाच्या बाहुल्या, मेणबत्त्या, मिठाई आदींची दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे यात्रेत आगळे चैतन्य होते.
भारतातील पहिले बाल येशू मंदिर म्हणून या स्थळाला विशेष महत्त्व आहे. सेंट झेवियर हायस्कूल मैदानात १० ते १५ हजार भाविकांची क्षमता असलेला भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. सकाळी ६ वाजल्यापासून विविध धर्मगुरूंकडून १४ मिस्सा झाल्या. 'तुम्ही पेरा, देव त्याची वाढ करेल' हा आजच्या उपदेशाचा प्रमुख विषय होता.
देश-विदेशातून भाविकांची उपस्थिती
मूळ भारतीय असलेले पण परदेशात वास्तव्यास असलेले तसेच विविध राज्यांतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह गुजरात, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू येथून भाविक आले आहेत.
भाविकांसाठी विशेष सुविधा
भाविकांच्या निवासासाठी ४० खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. १० हजार भाविकांसाठी प्रार्थना मंडप उभारण्यात आल्याची माहिती मुख्य धर्मगुरू एरल फर्नांडिस यांनी दिली.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंगळसूत्रचोरी, पाकीटमार तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस उपायुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, सातपूर व चुंचाळे या पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांसह सुमारे १५० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच ४० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते,