नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रविराम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. राऊत, आव्हाड या बोलघेवड्यांना दुसरा उद्योग दिसत नाही. उठसुठ टिका करतात. युध्द थांबले हे चांगले झाले तरी त्यांना सहन होत नाही, अशा शब्दात महाजन यांनी टीका केली आहे.
एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले की, युध्दजन्य परिस्थितीतही राजकारण करणे योग्य नाही. देशाला पाकपुरस्कृत अतिरेक्यांचा धोका आहेच पण त्यापेक्षाही अधिक धोका अशा वक्तव्य करणाऱ्यांचा आहे. आपली अर्थव्यवस्था वेगाने पुढे चालली आहे. पाकिस्तानकडे गमवायला काहीही नाही. आपली प्रगती थांबायला नको, म्हणून युद्ध थांबले असेल तर चांगले आहे. आपल्याला जे करायचे होते ते आपण केले आहे. आता युध्द थांबविण्यासाठी कोणी मध्यस्थी करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. टोकाची भूमिका घेण्यापूर्वी खूप विचार करावा लागतो. युध्द म्हणजे निवडणूक नसते. पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करून पहेलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. तरीही राऊत, आव्हाड टीका करत असतील तर त्यांची कीव करावीशी वाटते. तसेही त्यांचे अस्तित्व काही उरलेले नाही, अशा शब्दांत महाजन यांनी टीका केली. अजूनही काही ठिकाणी सीमेवर गोळीबार सुरू आहे. गोळीला गोळीने उत्तर देऊ, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तरीही पाकिस्तान सुधरत नसेल तर पाकिस्तानला धडा शिकविण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देखील महाजन यांनी दिला.
सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे होत नसल्याने साधु-महंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात महाजन यांना विचारले असता नाराजीचा काही विषय नाही. सिंहस्थ कामांसाठी कॅबिनेटच्या बैठकीत निधी मंजूर झाला आहे. वेळेत सगळी कामे होतील, असा दावा महाजन यांनी केला. सिंहस्थ तारखांबाबत साधु-महंतांना लवकरच निमंत्रण दिले जाईल. त्यानंतर त्यांची बैठक होईल. २० मेच्या आता सिंहस्थ तारखा जाहीर होतील, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना(शिंदे गट), राष्ट्रवादी(अजित पवार गट) महायुती म्हणूनच लढविणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. निवडणुका चार महिन्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश असले तरी पावसाळ्यात निवडणुका घेण्याबाबत सांशकता आहे. एकूणच निवडणूक आयोगाची भूमिका पाहता निवडणुका काही महिने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असेही महाजन यांनी सांगितले.