

जळगाव : नाशिकच्या पालकमंत्र्यांची घोषणा लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, कुंभमेळा मंत्री आणि जलसंपदा मंत्री या जबाबदाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीही माझ्याकडे आहे. जर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली, तर विकासकामांना अधिक गती देता येईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जळगाव येथे माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, सध्या आपत्ती व्यवस्थापन विभागही माझ्याकडे आहे. अजून नाशिकच्या पालकमंत्र्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, लवकरच हा निर्णय होईल. यापूर्वीही कुंभमेळा मंत्री, जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री या तिन्ही जबाबदाऱ्या माझ्याकडे होत्या. त्यामुळे पालकमंत्रिपदाची जबाबदारी मला मिळाल्यास कामांचे अधिक चांगले समन्वय साधता येईल आणि विकासाला वेग मिळेल.
दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांबाबत विचारले असता, महाजन म्हणाले की, खडसे यांनी शासनाकडे केवळ एकच मागणी केली आहे. त्यांनी एक वर्षापूर्वी स्वतः जमीन खरेदी केली असून, शासनाने त्याला योग्य तो भाव द्यावा, ही त्यांची वैयक्तिक मागणी आहे. तसेच, ग्रामसेवक आणि सरपंचांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्यास गावांचा चांगला विकास होऊ शकतो. शासनाने गरीब कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, त्यांचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळावा, असेही महाजन यांनी नमूद केले.