नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडिगो एअरलाइन्सने ६ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान प्रवासासाठी इंधन अधिभारात अंतरानुसार वाढ केली असून, नाशिक विमानतळावरून विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रत्येक तिकिटामागे किमान १०० ते कमाल ३५० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दरवाढीमुळे विमान प्रवासाचा खर्च वाढणार आहे.
इंडिगोने यापूर्वी देशांतर्गत मार्गांसाठी २७५ ते ९५० रुपये असा इंधन अधिभार आकारला होता. आता तो ३७५ ते १,३०० रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच अंतराच्या श्रेणीनुसार प्रतिप्रवासी, प्रतिप्रवास १०० ते ३५० रुपये वाढ झाली आहे. नवीन शुल्क ६ ऑक्टोबरपासून केलेल्या नवीन आरक्षणांना लागू आहे.
नाशिकहून अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना सर्वात कमी अंतराच्या श्रेणीतील वाढीचा फटका बसणार आहे. नाशिक-अहमदाबाद हवाई अंतर सुमारे ३५९ किलोमीटर असल्याने या मार्गासाठी इंधन अधिभार २७५ वरून ३७५ रुपये झाला आहे. त्यामुळे तिकिटाच्या इतर घटकांमध्ये बदल नसल्यास प्रवासाचा खर्च किमान १०० रुपयांनी वाढणार आहे.
नाशिक-हैदराबाद मार्गाचे अंतर सुमारे ५६९ किलोमीटर आहे. त्यामुळे हा मार्ग ५०१ ते एक हजार रुपये किलोमीटरच्या श्रेणीत येतो. या मार्गावरील इंधन अधिभार ४०० वरून ६०० रुपये झाल्याने प्रवाशांवर थेट २०० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
नाशिकहून दिल्ली, बंगळुरू किंवा चेन्नईसारख्या १,००१ ते १,५०० किलोमीटर अंतराच्या मार्गावर इंधन अधिभार ६०० वरून ९०० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रतितिकीट ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यापेक्षा लांब १,५०१ ते २,००० किलोमीटरच्या मार्गावर ८०० ऐवजी १,१५० रुपये, म्हणजेच ३५० रुपयांची वाढ झाली आहे.
नाशिक विमानतळावरून सणासुदीच्या काळात मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू आदी शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असताना ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे आधीच प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना आता तिकिटाच्या मूळ किंमतीबरोबरच वाढीव इंधन अधिभाराचाही अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.