Nashik MLC Result Twist 2026 
नाशिक

Nashik MLC Result Twist 2026 | दराडेंचा पराभव करत गिते शिवसेनेचे सहयोगी सदस्य

Nashik MLC Result Twist 2026 | नाशिक विधान परिषद निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे (शिंदे गट) नरेंद्र दराडे यांना पराभूत केल्यानंतर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. खा. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

दराडे यांचा पराभव महायुतीला किंबहुना शिवसेनेला मोठा धक्का मानला जात असताना एकनाथ शिंदे यांनी टाकलेल्या या गुगलीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नाशिकच्या विधान परिषदेची निवडणूक संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या जागेसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये झालेली चढाओढ, नाराजीनाट्य आणि मतांची फाटाफूट महायुतीची नाचक्की करणारी ठरली.

६१९ पैकी महायुतीकडे तब्बल ४६६ मतं असताना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना अवधी २४८ मतं मिळू शकली. अपक्ष गणेश गिते यांनी ४५७ मतं मिळवत १०९ मतांच्या फरकाने दराडे यांना पराभवाची धूळ चारली. या निकालामुळे महायुतीत सत्तासंघर्ष पेटण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच गिते यांचा शिवसेना प्रवेश नव्या सत्तासमीकरणांची नांदी ठरला आहे.

सकाळी मतमोजणी सुरू असताना गिते यांचा विजय टप्प्यात आल्याचे लक्षात येताच, राजकीय चक्रे फिरली. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. शिवसेनेचा पराभव झाला असला, तरी महायुतीत वैर नको या भावनेतून गणेश गिते यांनी बंधू गोकुळ गिते यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी गिते यांचे सहकारी नाना गामणे वांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर शिवसेनेचे मंत्री उदय सांमत होते, मी विशेष विमान पाठवत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाण्याकरिता गोकुळ गिते यांना तयार ठेवा, असे सांगितले गेले. निकाल जाहीर झाल्यानंतर सामंत हे स्वतः विशेष विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले. दुपारी गिते बंधूंना सोबत घेऊन ते मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विमानाने रवाना झाले. यावेळी आ. किशोर पाटील हेही उपस्थित होते.

उबाठातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशसोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गोकुळ गिते यांची भेट झाली. यावेळी गिते यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य होण्याची तयारी दर्शविली. शिंदे यांनी त्यास मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव होऊनदेखील शिवसेनेने गिते यांच्या रूपाने आमदारकी शाबूत ठेवली आहे.

मी भाजपचा सक्रिय सदस्य नाही. माझ्या वहिनी दीपाली गिते या भाजपच्या नगरसेविका आहेत. माझ्या कार्यकत्यांचा आग्रह होता म्हणून मला निवडणूक लढवावी लागली. मी प्रचार थांबवल्यानंतरही माझ्‌या कार्यकर्त्यांनी निवडणूक पुढे नेली . मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक आहे. मला एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली आहे. भविष्यात मला पक्षाची जबाबदारी दिली, तर मी ती पार पाडेन
गोकुळ गिते, नवनिर्वाचित आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT