केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Pudhari News network
नाशिक

राजकारणात 'तू राहशील किंवा मी राहीन' धमक्या चालत नाहीत - राज्यमंत्री आठवले

Ramdas Athawale | ईव्हीएमच्या नावे रडीचा डाव बंद करा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर विरोधक ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. लाेकशाहीचा हा अपमान आहे. ईव्हीएमवरून रडीचा डाव खेळण्यापेक्षा आत्मचिंतन करावे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. निवडणुकीतील पराभव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला आहे. राजकारणात तू राहशील किंवा मी राहीन अशा धमक्या चालत नाहीत, असा टोलादेखील त्यांनी ठाकरे यांना लगावला.

आठवलेंच्या मागण्या अशा

  • रिपाइंला मंत्रिपदासह अधिकाधिक महामंडळे मिळावी

  • नाशिक - मुंबई सहापदरी महामार्गासाठी केंद्राकडे प्रयत्न करणार

  • २०१९ मधील झोपड्यांना अधिकृत करताना रहिवाशांना पक्की घरे द्यावी

  • मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ करून अधिक भागभांडवल द्यावे

  • जानेवारीत नाशिकमध्ये बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करणार

नाशिक दाैऱ्यावर असलेले मंत्री आठवले यांनी रविवारी (दि. ८) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील तोट्यानंतर महायुतीने एकसंध काम करत अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. विधानसभेत त्याचा आम्हाला फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होती. त्यात संविधान बदल व आरक्षणावरील अपप्रचारामुळे आघाडीचा पराभव झाल्याचा आरोपही आठवले यांनी केला. विधानसभेतील पराभवानंतर विरोधक ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. मात्र, लोकसभेत तुमच्या जास्त जागा आल्या, तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का असा खोचक टोलादेखील त्यांनी विरोधकांना लगावला. मरकडवाडीमधील आंदोलनाची दखल निवडणूक आयोगाने घेत योग्य ती तपासणी करावी, असे आवाहन आठवले यांनी केलेे.

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सतत गद्दार, खोकेबाज अशी टीका केली. या टीकेमुळे शिंदे यांच्या जास्त जागा आल्याचा दावा आठवले यांनी केला. युतीमधून बाहेर पडून ठाकरे यांनी मोठी चूक केल्याचे सांगत, पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याचा असा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला. विरोधकांच्या शपथविधीवरील बहिष्काराबद्दल नाराजी व्यक्त करताना काल शपथ घेतली नाही. मग आज शपथ का घेता आहात, असा संतप्त सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या एक जागेसह मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आमचा पक्ष महायुतीसोबत असेल अशी घोषणाही आठवले यांनी केली.

राज ठाकरेंची हवा गेली

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली आहे. सत्तेत सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावल्याची टीका मंत्री आठवले यांनी केली. राज ठाकरेंमुळे महायुतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे युतीत ते परततील, असे वाटत नाही. तसेच मी असताना त्यांची गरज काय असा टोमणाही त्यांनी ठाकरेंना लगावला. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी आपले रंग बदलले. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा, हिरवा रंग होता. त्यांनी आता भगवा रंग हाती घेतला. त्यांच्या याच बदलत्या भूमिकेमुळे त्यांचा पराभव झाल्याची टीका आठवले यांनी केली.

तो नारा विराेधात नाही

भाजपच्या हिंदुत्वाचा नारा मुस्लीमविरोधी नसून, जे मुस्लीम पाकिस्तानला बळ देतात त्यांच्याविरोधात असल्याचा दावा मंत्री आठवले यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'बटेंगे तो कटेंगे'च्या नाऱ्याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्यांनी एकत्रित यावे असा आहे, असेही ते म्हणाले. आजचे राजकारण करताना कट्टर हिंदुत्वावर निवडून येणे अवघड आहे. राज ठाकरे व आमदार नितेश राणे यांनी हे लक्षात घेत मुस्लीमविरोधातील वक्तव्ये थांबवावीत, असा सल्लाही आठवलेंनी दोघांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT