नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान शुक्रवारी (दि. ११) आणि शनिवारी (दि. १२) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी झाडांची अनधिकृतपणे छाटणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी झाडे थेट बुडापर्यंत तोडण्यात आल्यामुळे शहरातील वृक्षसंपदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज महापालिकेच्या हाती लागले आहे.
गंगापूर रोड हा शहरातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग असून, या मार्गालगत मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आहे. शुक्रवारी व शनिवारीच्या मध्यरात्री रात्री २ ते ३ च्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी रस्त्यालगतच्या काही झाडांची छाटणी विनापरवानगी केली. एवढ्यावरच न थांबता काही झाडे बुडापर्यंत तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, संबंधित व्यक्तींच्या हालचाली आणि एमएच १५ जेसी ५८३८ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाहनाच्या आधारे संबंधितांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू असताना, वृक्षतोडीचे प्रकार वाढत असल्यास प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते आणि झाडांची तोड करण्यामागील कारण काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेतर्फे लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असून, प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. झाडांची अनधिकृत तोड किंवा छाटणी करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
"गंगापूर रोडवरील झाडांची बेकायदा छाटणी व तोड केल्याच्या घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून, सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल."- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका