घोटी (नाशिक): इगतपुरी - त्र्यंबकेेशर सीमारेषेवरील काकडपाणी परिसरात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत राहत्या घरात बनावट देशी व विदेशी मद्य तयार करणार्या दादा रामू बुधर (29) याला मुद्देालासह अटक केली.
आरोपीकडून 2 लाख 44 हजार 119 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची बनावट लेबले लावून देशी व विदेशी मद्याची निर्मिती करून ते चोरट्या पद्धतीने महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल्स तसेच काही दारू विक्रीच्या दुकानांध्ये पार्सलद्वारे पुरवठा केला जात असल्याची माहिती तपासात उघड झाली. या प्रकरणातील काही अज्ञात आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, लेबले व इतर साहित्य आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, अंलबजावणी व दक्षता विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपायुक्त उषा बर्मा मेहदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विभागीय भरारी पथकातील निरीक्षक पी. एम. गौडा, दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, किरण धुंदळे, सहायक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे यांच्यासह विलास कुंवर, धनराज पवार, महेश सातपुते, युवराज रतवेकर, राहुल पवार तसेच महिला कर्मचारी सुनीता महाजन उपस्थित होते. या प्रकरणाचा पुढील तपास राहुल मोडक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक हे करीत आहेत.