इगतपुरी : तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, इंद्रायणी भाताला इतर बाजारपेठांच्या तुलनेत ५०० रुपये, तसेच १००८ भातालाही इतर बाजारपेठांच्या तुलनेत ३०० रुपये जादा भाव देण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती घोटीच्या समन्वय सभेत घेण्यात आला. व्यापारी वर्गानेही या निर्णयाला सहमती दर्शविली.
शुक्रवारी (दि. २०) झालेल्या घोटी बु. सभागृह बाजार समिती शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांनी भाताला ६ हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने व्यापारी वर्गाला पत्र देऊन तालुक्यातील भाताची खरेदी ६ हजार रुपये भावाने करावी, असे कळविले होते.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समिती सभागृहामध्ये संचालक, व्यापारी व शेतकरी प्रतिनिधींची समन्वय सभा झाली.
सभेत तांदळाचे बाजारभाव, बाजारातील स्पर्धा आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर शेतकरी प्रतिनिधी, बाजार समिती पदाधिकारी व संचालकांनीही मते मांडली. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख भात बाजारपेठांचे दररोजचे बाजारभाव घेऊन ते व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय भाताचे भाव ठरविणे किंवा कमी जास्त करणे हा बाजार समितीचा अधिकार नसल्याचे आमदार हिरामण खोसकर, पांडुरंग बन्हे, माजी जि.प. सदस्य उदय जाधव, बाजार समितीचे माजी सभापती संपत काळे यांनी सभेत स्पष्ट केले.
दरम्यान, भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे यांनी प्रक्षोभक व बदनामीकारक व्हिडिओ तयार करून व्यापारी, बाजार समिती आणि बाजारपेठेची बदनामी केल्याचा आरोप सभेत करण्यात आला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
यावेळी मविप्र संचालक अॅड. संदीप गुळवे, उपसभापती रमेश जाधव, माजी सभापती कचरू पा. शिंदे, पांडुरंग शिंदे, सुदाम पा. भोर, रघुनाथ तोकडे, संचालक शिवाजी शिरसाठ, दिलीप चौधरी, माजी उपसभापती संपत वाजे, रमेश जाधव, भरत आरोटे, अॅड. मारुती आघाण, अर्जुन पोरजे, रामदास मालुंजकर, खंडेराव भोर, गोविंद शेलार, समाधान गुंजाळ, संतोष कोकणे यांच्यासह व्यापारी वर्ग उपस्थित होता.
व्यापाऱ्यांची बाजार फी कमी करण्याची मागणी फेटाळली
परपेठेतून येणाऱ्या भात व तांदळावर दुसऱ्यांदा बाजार फी आकारली जात असल्याने ती कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. मात्र, बाजार फीबाबतचा निर्णय वार्षिक सभेत झालेला असल्याने त्यात कपात करता येणार नसल्याचे बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले. या दरांच्या तुलनेत इंद्रायणीला ५०० आणि १००८ भाताला ३०० रुपये जादा भाव देण्याचे ठरले. व्यापारी वर्गानेही या निर्णयाला मान्यता दिली.