नाशिक

जमिनीचे लिलाव केले, तर गाठ माझ्याशी ; बच्चू कडू यांचा जिल्हा बँक अधिकाऱ्यांना इशारा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँकेने जमीन लिलावाचे धोरण बंद करावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी शेतकऱ्यांसोबतच आहे. शेतकरी बांधव गेले ९७ दिवस आंदोलन करत आहेत, त्यांच्या सातबारावर परस्पर सोसायटीचे नाव लावले जात आहे. आता हे थांबले पाहिजे अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.

जिल्हा रुग्णालयासमोर ९७ दिवसांपासून जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना कडू यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, हे कर्ज १० ते १५ वर्षांपूर्वी घेतले गेलेले आहे. त्यामध्ये टप्पे करून आपल्याला कर्ज फेडावे लागणार आहे. नुसते आंदोलने, घोषणांना अर्थ नाही. काहीतरी धोरणात्मक काम करायला हवे. तसेच संपूर्ण कर्जमुक्ती मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि इथे आंदोलनाला बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी असतात.

शेतकऱ्यांमध्ये एकी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, 97 दिवसांपासून इथे आंदोलन सुरू आहे. कोणी लक्ष देत नाही, हे दुर्दैव आहे. आता आपण यातून काहीतरी मार्ग काढू. वन टाईम सेटलमेंट करता येते का? यासाठी काय आवश्यक आहे ते तपासू. त्यासाठी आपल्या वतीने काही प्रस्ताव तयार करू. येत्या 8 तारखेला मुंबईमध्ये सर्वजण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. यासाठी भुजबळ, भुसे यांना देखिल सोबत घेउ आणि मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

थेट जिल्हा बँकेच्या प्रशासकांना फोन
दरम्यान, शेतकऱ्यांना संबोधित करत असतानाच आ. कडू यांनी जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. तुम्ही अशी सक्तीची वसुली तत्काळ थांबवा. आपण काहीतरी प्रस्ताव तयार करा आणि येत्या ८ तारखेला आमच्यासोबत चला, मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण मार्ग काढू. मात्र तुर्तास शेतकऱ्यांची वसुली थांबवा. ज्यांची जास्त रक्कम आहे, माजी संचालक आहेत त्यांची वसूली करा. शेतकऱ्यांना त्रास द्याल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. बँक पण वाचली पाहीजे आणि शेतकरी देखिल वाचला पाहीजे. त्यामुळे काहीतरी योग्य धोरण तयार करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT