सटाणा (नाशिक) : प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातलगांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील जायखेडा येथील एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी उघडकीस आला.
युवकाने जीवनयात्रा संपवल्या प्रकरणी मृताच्या नातेवाइकांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी या प्रकरणी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर शनिवारी (दि.२८) सकाळी मृत युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जायखेडा येथील विकी रवींद्र अहिरे याचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध मुलीच्या नातलगांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून विकी यास दमबाजी करण्यात येत होती. तसेच त्याच्याविरोधात खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात होती, त्यामुळे तो तणावात होता. या जाचास कंटाळून त्याने शुक्रवारी (दि. २७) श्रीपुरवडे रोडवरील मळ्यातील घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचा आरोप नातेवाइकांनी करत मृतदेह खाली न उतरविण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर मृतदेह उतरवून नामपूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. परंतु, या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत नातेवाइकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला.
उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे व सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाइकांची समजूत काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी सकाळी चौथ्या संशयिताला अटक केल्यानंतर मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौघा संशयितांना शनिवारी (दि. २८) सटाणा न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक सागर काळे तपास करीत आहेत.