नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विभागात बारावीच्या परीक्षेला सोमवार (दि.१०) पासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यात चार कॉपी प्रकरणांचा अपवाद वगळता नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सर्वच केंद्रांवर परीक्षा प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.
नाशिक विभागीय मंडळाच्या अखत्यारितील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांत बारावीची परीक्षा एकाच वेळी सुरू झाली. यंदा नाशिक विभागातून एकूण १ लाख ७३ हजार ६५१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असून, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती.
सकाळच्या सत्रात ठरलेल्या वेळेनुसार प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या आणि परीक्षा केंद्रांवर शिस्तबद्ध वातावरण दिसून आले. पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यात चार ठिकाणी कॉपी प्रकरणे उघडकीस आली.
संबंधित प्रकरणांमध्ये दोषी विद्याथ्यर्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, या अपवादात्मक घटनांखेरीज उर्वरित नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कुठेही कॉपी, गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पालक व विद्यार्थ्यांनीही नियमांचे पालन करत सहकार्य केल्याचे चित्र दिसून आले. पुढील परीक्षा देखील अशाच शांततेत पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे विभागीय मंडळाने सांगितले.
परीक्षा केंद्रांवर भरारी पथके तैनात
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली होती. परीक्षा केंद्रांवर भरारी पथके तैनात करण्यात आली होती, तसेच प्रश्नपत्रिका सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना, वेळेवर वितरण, सीसीटीव्ही देखरेख आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक व शिक्षकांनीही आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडल्याने परीक्षा प्रक्रियेत कुठेही अडथळा आला नाही. पेपरनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.