पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
काहींच्या आयुष्यात दिवाळी दरवर्षी येते. मात्र, काहींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी येण्यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. पिंपळगाव बसवंत येथील अंबिकानगरमधील हिराबाई गोपाळा गावीत यांच्या कुटुंबासाठी यंदाची दिवाळी अशीच विस्मरणीय ठरली आहे.
तब्बल ५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरात विजेचा दिवा उजळला असून, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अंधाराच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सन १९७० च्या दुष्काळानंतर हिराबाई गावीत या कुटुंबासह अंबिकानगर येथे वास्तव्यास आल्या. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांना बेघर वस्तीतील घर मिळाले.
मात्र, हे घर दुसऱ्याच्या नावे असल्यामुळे आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे वीजजोडणी मिळवण्यात मोठी अडचण निर्माण होत होती. अनेकांकडे मदतीची विनंती करूनही प्रश्न सुटत नव्हता.
परिणामी, अनेक वर्षे या कुटुंबाला अंधारातच दिवस काढावे लागले. सुरुवातीला केरोसीनचा दिवा, त्यानंतर तेलाचा दिवा आणि मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी संसाराचा गाडा हाकला. पती अपंगत्वाने त्रस्त असताना, या परिस्थितीचा सामना करणे अधिकच कठीण होते. अखेर गणेश शेवरे, मार्तंड वाघ यांनी हा प्रश्न महावितरणचे सहायक अभियंता ए. ए. लंके यांच्या निदर्शनास आणून दिला.
त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत गावीत यांच्या घराला अधिकृत वीजजोडणी देण्यात आली. तब्बल पाच दशकांच्या प्रतीक्षेनंतर घरात वीज पोहोचल्याने गावीत कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. यंदाची दिवाळी त्यांच्या घरात पहिल्यांदाच विजेच्या प्रकाशात साजरी होणार आहे. केवळ घरात वीज आली नाही, तर त्यांच्या आयुष्यात आशेचा आणि आनंदाचा नवा प्रकाश उजळला आहे.
गरजू कुटुंबाच्या घरात अनेक वर्षानंतर विजेचा प्रकाश पोहोचवता आला, याचे महावितरण परिवारामध्ये मनापासून समाधान आहे. अंधार दूर करून प्रत्येक घरात प्रकाश पोहोचवणे हे महावितरणचे खरे कर्तव्य असून, या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद हा आमच्यासाठी मोठा आनंद आहे.— ए. ए. लंके, सहायक अभियंता, महावितरण
इतकी वर्षे आम्ही अंधारात दिवस काढले. कधी केरोसीनचा दिवा, तर कधी मेणबत्तीच्या आधारात संसार केला. आज घरात वीज आल्यामुळे खूप आनंद झाला असून, यंदाची दिवाळी आमच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रकाशाची दिवाळी ठरणार आहे. त्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि मदत करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.— हिराबाई गावीत, अंबिकानगर, पिंपळगाव बसवंत