नाशिक : महापालिका क्षेत्रातील ६५८ रुग्णालय, नर्सिंग होम, सुश्रृषागृहांच्या परवाना नुतनीकरणाच्या ऑनलाईन प्रक्रियेला महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे वेग देण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत नोंदणी व नुतनीकरणासाठी ५८ अर्ज प्राप्त झाले असून ५८ रुग्णालयांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. ३६ रुग्णालयांची कागदपत्रे अपुर्ण असल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत वैद्यकीय विभागामार्फत ही माहिती सादर करण्यात आली. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९ अंतर्गत महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी (सुधारीत) नियम २०२१ नुसार महापालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे तसेच दर तीन वर्षांनी परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. रुग्णालय नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे यापूर्वी ऑफलाईन अर्ज सादर केले जात होते. मात्र, त्यात अनागोंदी समोर आल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी रुग्णालय नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, १५ एप्रिलपासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यात रुग्णालयाच्या नोंदणी व नुतनीकरणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या संकेतस्थळावर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित नर्सिंग होम, हॉस्पीटल मालक, संचालकांवर सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय विभागाकडून प्राप्त अर्जांची ऑनलाईन तपासणी केली जात आहे. प्रस्ताव परिपूर्ण असल्यास महापालिकेची फी चलनाद्वारे भरल्यानंतर नोंदणी, नुतनीकरण प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहे. आतापर्यंत ५८ रुग्णालयांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र कागदपत्र अपूर्ण असल्याने ३६ रुग्णालयांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत २४ रुग्णालयांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे.
अर्ज प्रलंबित राहिल्यास अधिकारी जबाबदार रुग्णालयांच्या नोंदणी व परवाना नुतनीकरण प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया आॉनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत कोणतीही प्रकरणे जास्त कालावधीसाठी प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले असून तसे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.