Nashik News | रुग्णालय नोंदणी होणार ऑनलाईन

नाशिक महापालिका सुरू करणार स्वतंत्र पोर्टल
नाशिक
रुग्णालय नुतनीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी घेतला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : शहरातील रुग्णालयांची नोंदणी तसेच परवाना नुतनीकरणासाठी होत असलेली फरफट लक्षात घेता नोंदणी व परवाना नुतनीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी घेतला आहे. रुग्णालय नुतनीकरण व नोंदणीची क्लिस्ट प्रक्रिया या पोर्टलच्या माध्यमातून सुलभ केली जाणार असून, नोंदणी व परवाना नुतनीकरणाअभावी अनधिकृत ठरत असलेल्या रुग्णालयांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

महापालिका क्षेत्रात जवळपास ५७१ रुग्णालये, प्रसुतीगृह व नर्सिंग होम्स आहेत. मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ अन्वये महापालिका कार्यक्षत्रातील रुग्णालये, प्रसुतिगृहे, नर्सिग होमला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे तसेच निर्धारीत कालावधीनंतर परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. नवीन रुग्णालय असेल तर नोंदणी आणि यापूर्वी नोंदणी असेल तर दर तीन वर्षांनी परवाना नुतनीकरण करावे लागते. मात्र, वैद्यकीय विभागासह अग्निशमन, नगररचना विभागाकडून रुग्णालयांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. इंडीयन मेडीकल असोशिएशनकडून याबाबत आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे परवानग्यांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय आयुक्त खत्री यांनी घेतला आहे. रुग्णालय नोंदणी व परवाना नुतनीकरणासाठी लागणारा विलंब याद्वारे टाळता येणार आहे.

परवाना नुतनीकरणासाठी या कागदपत्रांची आवश्यकता

परवाना नुतनीकरणासाठी रुग्णालयाची कागदपत्रे, डॉक्टर तसेच नर्सचे सर्टीफिकेट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला, अग्निशमन विभाग तसेच नगररचना विभागाची परवानगी लागते. यासोबतच बायोमेडीकल वेस्टचेही प्रमाणपत्र आणि इलेक्ट्रीक ऑडीटचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. सर्व कागदपत्रे वैद्यकीय विभागाकडे जमा केल्यानंतरच नोंदणी किंवा परवाना नुतनीकरण केले जाते.

उद्यान विभागाचेही स्वतंत्र पोर्टल

उद्यान विभागाकडे वृक्षतोड आणि वृक्षांच्या छाटणीसाठी अर्ज केले जातात. परंतु, या अर्जांचा वेळेवर निपटारा केला जात नाही. यात नागरिकांची पिळवणूक होत असल्याच्या तकारी आयुक्तांपर्यत आल्या आहेत. त्यामुळे आयुक्त खत्री यांनी उद्यान विभागाच्या परवानग्यांसाठीही स्वतंत्र पोर्टल विकसीत करण्याचे निर्देश उद्यान अधिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना वृक्षतोड वा छाटणीसाठी महापालिकेत चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

वैद्यकीय विभाग आणि उद्यान विभागातील परवानग्यांसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जात आहे. नागरिकांना यापुढे घरबसल्या परवानगी तसेच नुतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे या दोन्ही विभागांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल.

मनिषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news