नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन 'होमेथॉन' गृहप्रदर्शनाला लाखोंच्या संख्येने नागरिकांनी भेट दिली होती. यंदा ही संख्या विक्रमी असेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून घर खरेदीदार, गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित नागरिक प्रदर्शनात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर १८ ते २१ डिसेंबरदरम्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी (दि. १८) प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३०ला उद्घाटन करण्यात येणार आहे. 'होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५' हे नाशिककरांसाठी घर खरेदीची सुवर्णसंधी, गुंतवणुकीचा विश्वासार्ह मंच आणि पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकसाठी विकासाची मोठी पर्वणी ठरत आहे. कुंभमेळ्यानिमित्ताने शहरात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे. केंद्र, राज्य सरकार आणि नाशिक मनपाकडून रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर नागरी सुविधांवर मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधा वाढल्या की, त्या परिसरातील मालमत्तेच्या किमती वाढणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी घर खरेदी किंवा गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी 'होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो' महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.
प्रदर्शन यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुनील गवादे, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन, भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, प्रशांत पाटील, मुकुंद साबू, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे परिश्रम घेत आहेत.
नाशिक परवडणाऱ्या घरांचे शहर
नाशिकला इतर महानगरांच्या तुलनेत घरांचे दर कमी आहेत. १५ ते २० लाखांच्या दरम्यान १ बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत. ४ ते ७ रूम किचन या फ्लॅटला सुद्धा ग्राहकांची अधिक पसंती आहे, अशी माहिती होमेथॉनचे सचिव शंतनू देशपांडे यांनी दिली. मध्यमवर्गीयांसाठी नाशिक हे घरखरेदीसाठी आकर्षक ठिकाण बनले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह गोविंदनगर, गंगापूर रोड, सोमेश्वर, नवशा गणपती, सिडको, पंचवटीत घरखरेदीसाठी नागरिकांचा कल दिसत आहे.