पंचवटी/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'सियावर रामचंद्र की जय', 'जय श्रीराम', 'पवनपुत्र हनुमान की जय'चा जयघोष, वरुणराजाच्या सरी अशा धार्मिक वातावरणात श्री काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर २१ फूट उंच पितळी ध्वजदंडाचा ध्वजारोहण व ध्वजपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.६) झाला. यावेळी यज्ञपूजाही झाली.
या ध्वजपूजनातून एक प्रकारे आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा शंख फुंकला गेला. श्री काळाराम मंदिरावर पितळी ध्वजदंड दोन दिवसांपूर्वी उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामकृष्ण कोविंद यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात ध्वजारोहण करण्यात आले.
भगव्या रंगातील या कापडी ध्वजावर भगवान हनुमान यांचे चित्र आहे. यावेळी अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह शैव व वैष्णव पंथाचे साधू-महंत, भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.
यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री काळाराम मंदिरावर उभारण्यात आलेला ध्वजदंड पंचधातूपासून तयार करण्यात आला आहे. ध्वजदंडाची उंची २१ फूट आहे. ११ बाय ५ फुटांचा भगवा ध्वज असून, या ध्वजावर हनुमंतरायाची प्रतिमा आणि सूर्यदेवाचे ॐ चिन्हांकित करण्यात आले आहेत. अतिशय कलाकुसर केलेला हा ध्वजदंड आता नाशिकचे भूषण ठरले आहे. त्याचबरोबर कुंभमेळा पर्वाचे संकेतही देत आहे.
ध्वजदंडाची वैशिष्टये
धातू : पंचधातूपासून तयार
उंची: २१ फूट आहे
आकार : ११ बाय ५ फूट
रंग : भगवा
चिन्हांकन : हनुमंतरायाची प्रतिमा आणि सूर्यदेवाचे ॐ अक्षर
सामाजिक समतेचा संदेश
श्री काळाराम मंदिराला प्राचीन इतिहास असून, याच ठिकाणी डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित धर्मध्वजारोहण सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे सहकुटुंब उपस्थितीत होते. यातून सामाजिक समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला का, अशी चर्चा रंगली होती
श्री काळाराम मंदिराचा जो प्राचीन परंपरागत ध्वज होता, त्यावर हनुमंतरायाचे चिन्ह होते. प्रभू श्री रामचंद्र हे सूर्यवंशीय असल्याने ध्वजावर सूर्य चिन्ह असणे अनिवार्य आहे. हा ध्वज धर्माचे सर्वोच्च प्रतीक असून, परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन हा नवीन ध्वजदंड उभारण्यात आला आहे.- महंत सुधीरदास