पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या २४ तासांत राज्यात २३६.६ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असला, तरी दिवसभर पणजी परिसरात चक्क ऊन पडले होते. रात्री मात्र सरीवर सरी बरसल्या.
विशेष म्हणजे हवामान विभागाने आजपर्यंतच यलो अलर्ट जाहीर केला असून पुढील काळासाठी कुठलाही इशारा तूर्तास दिलेला नाही. राज्यात सर्वाधिक ७२.४ मिमी पाऊस पडला, तर सर्वात कमी २.४ मिमी पाऊस मुरगावमध्ये पडला. पणजीत ३.२ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षाच्या तुलनेत आज, पावसाची तूट ४२ टक्के होती.
राजधानी पणजीत आज दुपारपासून पडत असलेल्या पावसामुळे शहराचा प्रमुख व्यापारी मार्ग असलेल्या १८ जून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यावर गुढघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज रविवार असल्याने काही दुकाने बंद होती त्यामुळे पाणी आत घुसले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानांमधील माल सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व्यापारी आणि कर्मचारी यांची धावपळ उडाली. रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवण्यात आलेल्या दुचाकींची चाके पाण्यात बुडाली होती.
१८ जून रस्त्यावर पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. स्थानिकांनी शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थेबाबत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला.
या मार्गावरील व्यापाऱ्यांनी दरवर्षी या समस्येला सामोरे जावे लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अर्धा तासात पाऊस पडून हे पाणी साचले तर पाऊस सतत लागला या ठिकाणी पूर येईल असे मत व्यक्त केले.
पणजी शहरात अतिवृष्टीच्या काळात १८ जून रस्ता आणि काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या वारंवार उद्भवत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि व्यापारी संघटनांकडून सातत्याने होत आहे. मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भूमिगत गटारांची कामे केली तरीही पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार बंद झाले नसल्याने या कामांबाबतच आता संशय व्यक्त होत आहे.
म्हापसा : ४.०
पेडणे : ३.२
पणजी : ३.२
जुने गोवे : १०.३
साखळी : १०.५
वाळपई : ४३.४
फोंडा : ४५.८
धारबांदोडा : ७२.४
काणकोण : ४.४
दाबोली : ३.०
मडगाव : ७.१
मुरगाव : २.४
केपे : १५.०
सांगे : १०.५
डिचोली तालुक्यात रविवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुसळधार पावसाने जोर धरल्याने तालुक्यातील अनेक सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याने वाहतुकीसह वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे विविध भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गॅससोय झाली.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच विद्युत खांबांवर झाडे आणि फांद्या कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळाली. घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान विविध ठिकाणी मदत व बचावकार्यात दाखल झाले. रस्त्यावरील पडझड हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर काम केले. दरम्यान, आपत्कालीन नियंत्रण कक्षाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी सातत्याने संपर्क ठेवला असून, कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तातडीने मदत पुरविण्यास प्रशासन सज्ज असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.