ठळक मुद्दे
स्वातंत्र्यदिनीच पालकमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला
नाशिकचा पालकमंत्री मीच होणार! मंत्री गिरीश महाजन यांचा दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार : पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हे मुख्यमंत्री ठरवतील
नाशिक : स्वातंत्र्यदिनी मंत्री गिरीश महाजन व मंत्री छगन भुजबळ यांच्यात पालकमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगलेला असतानाच आता सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात याच मुद्दावरून वाद पेटला आहे. नाशिकचा पालकमंत्री मीच होणार! असा वक्तव्य करत मंत्री महाजन यांनी थेट या पदावर दावा ठोकत मोठा बॉम्ब फोडला आहे. तर, सात आमदार एकच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, असे सांगत, मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह कायम ठेवला आहे. दुसरीकडे, जळगावमध्येही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री वादावर भाष्य केले आहे. पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हे मुख्यमंत्री ठरवतील असे सांगत, या विषयावरून वाद करण्याचे काही कारण नाही असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलेल. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून आता भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमऩे-सामने आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते मंत्री महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला शिंदे गटातील नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची घोषणा स्थगित करण्यात आली होती. यानंतर अद्यापही महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. 15 आॅगस्ट रोजीच्या ध्वजारोहनाच्या निमित्ताने पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला आहे. याच मुद्दयावरून नाशिकच्या रणागंणात मंत्री महाजन आणि मंत्री भुजबळ यांच्यात शाब्दीक वाकयुध्द रंगले. ध्वजारोहन झाल्यानंतर, हा वाद शमेल असे अपेक्षित वाटत असताना हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
महायुतीत पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाचा मंत्री महाजन यांनी धुळे येथे दहीहंडीच्या उत्सवात हजेरी लावत नाशिकच्या पालकमंत्रीपदावर थेट दावा केला आहे. नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार, असे त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री महाजन म्हणाले की, पावसाने ब-याच दिवसापासून दडी मारली होती. मात्र, आता पावसाच्या आगमन झालेले आहे. पाऊस सुरू असून देखील दहीहंडीच्या उत्सवासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. मी दरवर्षी दहीहंडी उत्सवासाठी धुळ्याला येत असतो. नाशिकला देखील मी जात असतो, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र महाजन यांच्याकडून आता थेट दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री महाजन यांच्या केलेल्या दाव्यावर मंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि.17) जळगाव मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना लागलीच प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले की, धुळे नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार असताना पालकमंत्रीपदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायलाच लागेल. सात आमदार एकच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, असे म्हणत भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह कायम ठेवला आहे. अजित पवार आणि सुनील तटकरेंशी मी बोलेल, एक आमदार असताना आपण पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो तर सात आमदारांसाठी शक्ती लावा, असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.