नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या दत्तनगर, मारुती संकुल, तुळजाभवानी परिसर तसेच आसपासच्या भागातील दूषित पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. ८) प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नागरिकांच्या घराघरांत जाऊन त्यांनी कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या तसेच दूषित पाण्यामुळे त्वचेच्या तक्रारी व अन्य त्रास जाणवत असलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेतल्या.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी ऐकून मंत्री महाजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
नागरिकांना सुरक्षित आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देताना दूषित पाण्याचा वापर नागरिकांकडून होऊ नये आणि त्यातून आरोग्यावर आणखी गंभीर परिणाम होऊ नयेत, यासाठी प्रभावित भागातील हातपंप आणि कूपनलिका तातडीने सील करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेत मंत्री महाजन यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, दोषी घटकांची चौकशी करून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर कठोर पावले उचलावीत,
अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आहेर - आडके, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह उद्योग - पर्यावरण विभाग, मनपा अधिकारी - कर्मचारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
"अंबडमधील परिस्थिती केवळ दूषित पाण्याची समस्या नसून, नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाच्या सुरंशी निगडित अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कागदी कारवाई न करता, प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत."— गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक
सीईटीपी प्रकल्पाचीही पाहणी:
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) प्रकल्पालाही मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रकल्पाच्या कामाला होत असलेल्या विलंबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना खडे बोल सुनावले. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असताना, सीईटीपीसारखा अत्यावश्यक प्रकल्प रखडणे अजिबात स्वीकारले जाणार नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून तो कार्यान्वित करा अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मंत्री महाजन यांनी संबंधित ठेकेदारांना दिला.