लासलगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत महाराष्ट्रातील कांदा खरेदीचा दर प्रतिक्विंटल ₹१,८७५ वरून ₹२,१२५ इतका वाढवला आहे. सुधारित दर शनिवार, ४ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ₹२५० अधिक मिळणार आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संचालक शिवानी गोयल यांनी याबाबत परिपत्रक काढले.
राष्ट्रीय कांदा बफर स्टॉक उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या या खरेदीसाठी नव्या दराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा सुधारित दर पूर्वीच्या दराच्या तुलनेत सुमारे १३ टक्के अधिक असल्याने कांदा उत्पादकांना चांगला आर्थिक आधार मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारातील कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः सध्या कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.
दरवाढीमुळे नाफेड आणि एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग येण्याची शक्यता असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.