नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ८ हजार ८७७ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला शासनाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या सर्व त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव नगरविकास विभागाच्या सचिवांच्या मंजुरीसाठी मंत्रालयात सादर केला आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेवर वाढणारी जबाबदारी आणि दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ, अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. कोट्यवधी भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान असताना सुधारित आकृतिबंधाच्या मंजुरीबाबत शासनाकडून होणारा विलंब महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे.
नाशिक महापालिकेचा समावेश 'ब' वर्ग महापालिकेत झाला असला, तरी आस्थापना परिशिष्ट मात्र अद्याप 'क' वर्गानुसारच आहे. सध्याच्या ७ हजार ७२५ मंजूर पदांपैकी सेवानिवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्तीमुळे सुमारे ३ हजार ८०० पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, गेल्या २४ वर्षांत महापालिकेत नियमित नोकरभरती झालेली नाही. परिणामी, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, नागरी सुविधांच्या अंमलबजावणीवरही त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने 'ब' वर्ग आस्थापनेनुसार ८ हजार ८७७ पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करून शासनाकडे पाठविला आहे. दहा वर्षांहून अधिक काळापासून हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
सिंहस्थ नियोजनावर परिणामाची शक्यता
सिंहस्थ नियोजनावर परिणामाची शक्यता सिंहस्थ कुंभमेळ्यात पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन यांसह विविध नागरी सुविधांची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. अशा वेळी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास नियोजनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नात लक्ष घालून आकृतीबंधाला तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश हवेत विरले ?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ७० नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आदेश हवेत विरल्याची चर्चा आहे. हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. त्याचाच भाग म्हणून नगरविकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून सध्या कार्यरत नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती मागविली होती. मनपा प्रशासनाने ही माहिती शासनाला सादर केली. मात्र नंतर त्यावर कुठलीही हालचाल झाली आहे. नगरविकास विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर संबंधित संचिका अंतिम मंजुरीसाठी सचिवांकडे सादर करण्यात आली आहे. तरीही मंजुरीचा निर्णय झालेला नाही.