Gold- Silver Rate
सोने चार, तर चांदी सहा हजारांनी स्वस्त file photo
नाशिक

Gold- Silver Rate | सोने चार, तर चांदी सहा हजारांनी स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी (दि.२३) सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी केल्याची घोषणा करताच, सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बुधवारी (दि. २४) सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. गेल्या काही काळापासून सातत्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होत असून, खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र, दर कमी होताच, पुन्हा एकदा सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.

अर्थसंकल्पाआधीचे दर

सोने : २४ कॅरेट, प्रति १० ग्रॅम - ७५ हजार

२२ कॅरेट, प्रति १० ग्रॅम - ६९ हजार

चांदी : प्रति १ किलो - ९२ हजार

अर्थसंकल्पानंतरचे दर

सोने : २४ कॅरेट, प्रति १० ग्रॅम, ७१ हजार ४००

२२ कॅरेट, प्रति १०० ग्रॅम, ६५ हजार ७००

चांदी : प्रति १ किलो ८७ हजार ६००

(सर्व दर जीएसटीसह)

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरांवर परिणाम होत असला तरी, वाढीव कस्टम ड्युटीची त्यात भर पडत होती. सोने-चांदीवर तब्बल १५ टक्के कस्टम ड्युटी आकारली जात असल्याने, त्याचा थेट परिणाम दरांवर होत होता. अर्थसंकल्पात कस्टम ड्यूटी नऊ टक्क्यांनी कमी केल्याने केवळ सहा टक्केच आकारली जाणार असल्याने, सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली. त्यातून उलाढाल वाढण्यास प्रारंभ झाला आहे.

आगामी सण-उत्सव तसेच लग्नसराईमध्ये सोने-चांदी दर आटोक्यात राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोने-चांदीचे दर कमी झाल्याने सराफ व्यावसायिकांसह गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी झाल्याने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळातील सण-उत्सव तसेच लग्नसराईमध्येदेखील दर कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या पावसामुळे ग्राहकांची संख्या फारशी दिसत नसली तरी, पावसाने उसंत घेताच सराफ बाजारात ग्राहकांची रेलचेल वाढण्याची शक्यता आहे.
- गिरीष नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन
SCROLL FOR NEXT