नाशिक : सोने-चांदी दराने सुसाट वेग पकडला असून, दरदिवसाला सोने-चांदीचे दर सर्वकालीन हंगामीतील उच्चांक नोंदवित आहेत. विशेषत: चांदी दराने टॉप गियर टाकला असून, गुरुवारी (दि.९) तासाभरातच चांदीने तब्बल सात हजारांची वाढ नोंदविली आहे. त्यामुळे चांदी विक्रमी एक लाख ६७ हजारांंवर पोहोचली असून, दिवाळीच्या मुहूर्तावर चांदी दोन लाखांच्या समीप जाण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या वेगवान घडामोडींचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होत आहेत. १ जानेवारी ते ६ आॅक्टोंबर २०२५ दरम्यान सोने-चांदीने तब्बल ५० वेळा उच्चांकी दरांंची नोंद केली असून, गुरुवारी ५१ वेळा उच्चांकी दर नोंदविला आहे. विशेषत: चांदीच्या दरात मोठी उसळी बघावयास मिळाली. आतापर्यंत एका दिवसात चांदी दरवाढीचा विक्रम साडे चार हजार इतका होता. मात्र, गुरुवारी हा विक्रम मोडीत काढत सात हजारांची दरवाढ नोंदविली गेली. दरम्यान, दिवाळीत चांदी दोन लाखांच्या समीप जाण्याचा अंदाज असून, सोने देखील दीड लाखांवर जाण्याची शक्यता आहे.