

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसरा सणाच्या पूर्वसंध्येला सोन्या-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर आता 1 लाख 21 हजार प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला.
कोल्हापूर सराफ संघाने दिलेल्या माहितीनुसार, 1,500 रुपयांच्या मोठ्या वाढीसह 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर आता 1,21,000 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मंगळवारी (दि. 30) सोन्याचा दर 1 लाख 19,500 रुपये होता. गतवर्षी दसर्याला सोन्याचा दर 78 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यात एक वर्षात तब्बल 43 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
याचबरोबर, चांदी दरानेही पुन्हा विक्रमी झेप घेतली आहे. एका दिवसात चांदी 3,800 रुपयांच्या वाढीसह 1 लाख 50,200 प्रतिकिलो या नव्या उच्चांकावर पोहोचली आहे. मंगळवारी दर 1 लाख 46 हजार 400 रुपये प्रतिकिलो होता. तर, गतवर्षी दसर्याला चांदीचा दर 80,000 रुपये प्रतिकिलो होता.