नाशिक : विकास गामणे
गत पंचवीस वर्षे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या निफाड तालुक्यात आता मोठे राजकीय स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत निफाडचे राजकारण प्रामुख्याने आमदार दिलीप बनकर आणि माजी आ. अनिल कदम या दोनच नेत्यांच्या भोवती फिरत होते. अनेक राजकीय महारथींनी या दोघांना बाजूला सारण्याचा किंवा तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्नही केला मात्र, त्यात यश आले नाही.
परंतु, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवत आमदार गोकुळ गिते यांच्या रूपाने निफाड तालुक्यात सत्तेचे नवीन आणि ताकदवान केंद्र तयार झाले आहे. निफाडला १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार मंदाकिनी बनकर विरुद्ध दिलीप बनकर यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी बनकर पराभूत झाले. २००४ निवडणुकीत तेच बनकर कदम यांना पराभूत करून विधानसभेत पोहोचले. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने अनिल कदम यांना रिंगणात उतरविले.
आक्रमक शैली अन् थेट मिडणारा स्वभाव निफाडकरांना भावला. त्यामुळे निफाडकरांनी पदरचा पैसा देऊन त्यांना विधानसभेत पोहोचविले. २०१४ च्या निवडणुकीतही निफाडकरांनी कदम यांना साथ दिली. त्यानंतर मात्र, २०१९ मध्ये यतिन कदम यांच्यामुळे तिरंगी लढत झाली. स्व. रावसाहेब कदम आणि माजी आ. मंदाकिनी कदम यांचे चिरंजीव यतिन कदम यांनी २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात २५ हजार मते घेतली. मात्र, तिरंगी लढतीचा फायदा बनकरांना झाला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निफाडकरांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला. विधानसभा निवडणुकीत अनिल कदम चालतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र, दुरंगी लढत अन् यतिन कदम यांची महायुतीला मिळालेली साथ यामुळे बनकर यांच्या पथ्यावर पडली. याच निवडणुकीत भाजपकडून गणेश गिते यांची चाचपणी झाली होती.
मात्र, महायुती झाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे दोन दशके बनकर आणि कदम या दोन नेत्यांच्या राजकीय संघर्षावर आणि वर्चस्वावर अवलंबून राहिले आहे. पंचायत समिती, बाजार समित्या, तालुका संघ ते थेट विधानसभा, अशा सर्वच पातळ्यांवर या दोघांनी आपले वर्चस्व आलटून-पालटून अबाधित ठेवले. अनेक स्थानिक नेत्यांनी हे दुहेरी वर्चस्व मोडण्याचे प्रयत्न केले. मात्र, राजकीय समीकरणांनी नेहमीच या दोघांनाच पसंती दिली. मात्र, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत निफाडचे त्यातही गोदाकाठचे गोकुळ गिते यांनी विजय मिळवत, प्रस्थापित समीकरणांना जोरदार धक्का दिला.
अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर गिते यांनी राजकीय अंदाजांना खोटे ठरवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या मोठ्या विजयामुळे तालुक्याच्या राजकारणात नव्या पर्वाची पायाभरणी झाली आहे. तालुक्यातील सहकारात गिते यांनी चांगलेच पाय रोवलेले आहेत. गावनिहाय स्थानिक राजकारणही त्यांना माहिती आहे. त्यामुळे गिते यांच्या रूपाने केवळ एक नवीन आमदारच नाही, तर सत्तेचे आणि राजकीय ताकदीचे एक समांतर केंद्र निफाडमध्ये उभे राहिले आहे.
धनुष्यबाणा'चा नवा अन् तगडा चेहरा
आमदार गिते यांनी विधान परिषदेतील विजयानंतर राजकीय परिपक्वता दाखवत तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेची साथ निवडली. गिते आता सेनेचे सहयोगी सदस्य राहणार आहेत. या राजकीय निर्णयामुळे निफाड तालुक्यात शिवसेना (शिंदे) आणि त्यांच्या 'धनुष्यबाण' या चिन्हाला नवा चेहरा मिळाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने आणि सत्तेच्या केंद्राशी थेट संवाद असल्याने, आगामी काळात तालुक्यात विकासाचा मोठा निधी आणून गिते आपले राजकीय प्रस्थ अधिक मजबूत करतील, हे निश्चित मानले जात आहे.
गिते पर्वामुळे बदलणार समीकरणे
आ. गिते यांच्या यशामुळे आगामी विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे चित्र बदलणार आहे. आतापर्यंत समोरासमोर लढल्या जाणाऱ्या निफाडच्या राजकारणात आता पूर्णपणे नव्या राजकीय आघाड्यांची आणि समीकरणांची शक्यता आहे.
आ. गिते यांची रणनीती, त्यांची ताकद आणि त्यांना मिळालेले उपमुख्यमंत्र्यांचे पाठबळ पाहता, निफाडच्या राजकीय रणांगणात खऱ्या अर्थाने 'गिते पर्वा'ला सुरुवात झाली आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. येणाऱ्या काळात निफाडचा गड राखण्यात जुने शिलेदार यशस्वी होतात की, 'गिते पर्व' राजकीय मैदान मारते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.