नाशिक

Godavari Gaurav Award | कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

Godavari Gaurav Award | सयाजी शिंदे, प्रशांत दामले, अनिरुद्ध पंडित यांच्यासह सहा जणांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

  1. गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा मंगळवारी (दि. १०) मार्च नाशिकमध्ये

  2. लोकसेवा पुरस्कारासाठी अभिनेता सयाजी शिंदे यांची निवड

  3. नाट्य क्षेत्रासाठी प्रशांत दामले, संगीतासाठी उस्ताद उस्मान खान यांचा सन्मान

  4. विज्ञान, चित्रकला आणि साहस क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव

  5. रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १९९२ पासून दर दोन वर्षांनी (द्वैवार्षिक) दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (दि.१०) मार्चला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश होळकर, प्रा. दिलीप धोंडगे, सहकार्यवाह राजेंद्र डोखळे, कोषाध्यक्ष अॅड. अजय निकम, सल्लागार अॅड. विलास लोणारी आणि लोकेश शेवडे उपस्थित होते.

गोदावरी गौरव पुरस्काराचे यंदाचे १८ वे वर्षे असून, यामध्ये सह्याद्री देवराई ही संस्था स्थापन करून राज्यात ४० ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आल्याने लोकसेवा हा पुरस्कार सयाजी शिंदे यांना जाहीर करण्यात आला.

विज्ञान क्षेत्रात रसायन अभियांत्रिकी आणि संशोधनातील योगदानासाठी डॉ. अनिरुद्ध पंडित, चित्रकला क्षेत्रामध्ये ठसा उमटविणारे आणि कॉल ऑफ द सिज, बॅण्डवाला, चाइल्डहुड लॉस्ट, प्रकृती पुरुष तसेच रंगारी असे चित्रप्रदर्शन गाजविणारे चंद्रमोहन कुलकर्णी, संगीत क्षेत्रात स्वामी शांतानंदजी यांच्याकडून सितार सितारा नाद योगी म्हणून गौरवप्राप्त झालेले उस्ताद उस्मान खान यांना पुरस्कार जाहीर झाला.

तसेच १२,५०० नाट्यप्रयोग सादर करणारे चतुरस्त्र अभिनेते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रासाठी, तर गिर्यारोहणात आवड निर्माण करण्याचे कार्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक आशिष माने यांना साहस क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला.

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी मंगळवारी (दि. १०) रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे संध्याकाळी ६ वाजता पुरस्कार सोहळा होणार असून, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते पुरस्कारार्थीना सन्मानित करण्यात येणार आहे.

कला, साहित्य, चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य, समाजसेवा, ज्ञान-विज्ञान अशा विविध क्षेत्रांत देशपातळीवर संस्मरणीय कामगिरी करणाऱ्यांना कृतज्ञता म्हणून सन्मानित करणे हा पुरस्कारामागील उद्देश असून, हा पुरस्कार उत्तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा नागरी सन्मान मानला जातो. गोदावरी गौरव पुरस्कारामध्ये २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह प्रदान केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT