

जालना–जिंतूर महामार्गावरील गणेशपूर पाटीजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला.
ज्येष्ठ पत्रकार नितीन धुत व सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे यांचा मृत्यू झाला.
दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला.
या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातप्रकरणी महामार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
परभणी : पुढारी वृत्तसेवा
जालना–जिंतूर महामार्गावरील गणेशपूर (ता. जिंतूर) पाटीजवळ मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धुत आणि जिंतूर येथील सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगरहून परभणीकडे जाणारी कार क्रमांक एमएच २२ ए डब्ल्यू ५११५ आणि जिंतूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी कार क्रमांक एमएच १४ एफएस ०८९७ यांची चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर पाटीजवळ मंगळवारी रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेव्हल, जाकेर सय्यद, बालासाहेब गीराम, मेथके व हाके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या चारही जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र रुग्णालयात तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पत्रकार नितीन धुत यांना मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी अवस्थेत असलेले सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मनोज कन्हैयालाल तोष्णीवाल आणि कार चालक विजय ताडकळसकर (दोघेही रा. परभणी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ पत्रकार नितीन धुत हे निर्भीड लेखन, सामाजिक विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणी आणि पत्रकारितेतील योगदानासाठी ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. या भीषण अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.