मालेगाव : उत्तर महाराष्ट्राची संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा धरणाने सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. शुक्रवारी (दि. ३१) सकाळच्या नोंदीनुसार धरणात ९५.९१ टक्के पाणीसाठा झाला असून, वाढत्या आवकेमुळे दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून २,४७६ क्युसेक्स (७०.०७ क्यूसेक) पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या माहितीनुसार दुपारी २ वाजता गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ व ६ प्रत्येकी ३० सेंमीने उघडण्यात आले. धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे परिस्थितीनुसार विसर्गात वाढ अथवा घट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गिरणा, मोसम व आरम नदीपात्रात विविध धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यानुसार चणकापूर धरणातून १०,७४६ क्यूसेक, पुनंद धरणातून १२,२४१ क्यूसेक, ठेंगोडा बंधाऱ्यातून ९,७४० क्यूसेक, हरणबारी धरणातून ३,१२८ क्यूसेक आणि केळझर धरणातून ८३९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने, मालेगाव पाटबंधारे विभागाने गिरणा, मोसम व आरम नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील नागरिक, जनावरे व साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गिरणा धरण भरल्याने मालेगाव, नांदगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा १७ हजार ७४४ दशलक्ष घनफूट इतका झाला असून, पाण्याची आवक अद्याप कायम आहे.
ठळक बाबी
धरणात ९५.९१ टक्के पाणीसाठा.
दुपारी २ वाजता दोन दरवाजे ३० सेंमीने उघडले.
२,४७६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू.
चणकापूर, पुनंद, ठेंगोडा, हरणबारी व केळझर धरणांतूनही विसर्ग.
नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर