नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे शिवसेना नेत्यांमध्ये मिश्कील टोलेबाजी रंगली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल, असे मिश्कील वक्तव्य केले होते. आता मंत्री गिरीश महाजन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत दादा भुसे यांना डिवचले आहे.
जळगाव जिल्ह्यात अमळनेरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन यांनी दादा भुसे यांनी पालकमंत्रिबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांबाबत मंत्री भुसेंना विचारले असता, त्यांनी "हा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल," असे मिश्कील उत्तर दिले होते. त्यावर, प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले की, भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कदाचित घनिष्ट संबंध असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील किंवा फोन करून काही तरी करा, अशी विनवणीही करतील. माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील माझी नाशिकचे पालकमंत्रिपद तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी चर्चा झालेली नाही," असे सांगत, मंत्री महाजन यांनी भुसेंना डिवचले.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा नेमका कधी सुटणार?
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे हे चारही नेते नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. तिढा न सुटल्यामुळे चारही मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आले असून, गिरीश महाजन यांना समितीप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा नेमका कधी सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.