नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सडेतोड प्रत्युत्तर दिले. 'राऊत यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे ते काय बोलतात, ते बोलू द्या. त्यांच्या वक्तव्याने काहीही फरक पडत नाही,' अशा शब्दांत महाजन यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चापूर्वी खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये 'जामनेर पॅटर्न'चा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना उत्तर देताना महाजन यांनी राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. पंतप्रधान, न्यायालय, निवडणूक आयोग अशा कोणालाही राऊत सोडत नाहीत. सध्या त्यांच्या पक्षाकडे केवळ दोन खासदार उरले आहेत. ते कोणाविरोधात काय बोलतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे महाजन म्हणाले.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी राऊत यांना थेट आव्हानही दिले. कारण नसताना बाष्कळ बडबड करण्यात काही अर्थ नाही. आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा एक तरी जिल्हा परिषद अध्यक्ष करून दाखवा, असे आव्हान महाजन यांनी दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव पालकमंत्री म्हणून नमूद करण्यात आल्याच्या चर्चेवरही महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. 'पत्रिकेत माझा उल्लेख माजी पालकमंत्री असा करण्यात आला आहे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या नावापुढे माजी असा उल्लेख केला जातो. त्याचप्रमाणे माझ्या बाबतीतही तो उल्लेख झाला असावा,' असे महाजन यांनी स्पष्ट केले.